Monday, August 17, 2026
Homeसातारासातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा उदय : संघटन, संघर्ष आणि नव्या राजकारणाची...

सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा उदय : संघटन, संघर्ष आणि नव्या राजकारणाची नांदी

फलटण :-  सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्हत्या, तर त्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरल्या. या निवडणुकांमधून प्रथमच वंचित बहुजन आघाडी ने इतक्या मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती नोंदवली आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एक वेगळी, वैचारिक आणि चळवळीवर आधारित राजकीय शक्ती म्हणून स्वतःला सिद्ध केले.

या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व आणि सातारा जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांचे संघटनात्मक मार्गदर्शन. विशेष बाब म्हणजे, अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रामदास कांबळे यांनी जिल्हाभर संघटन उभे करत तब्बल २८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात वंचित बहुजन आघाडीने केलेला हा सर्वात मोठा आणि धाडसी प्रयत्न ठरला.

या निवडणुकीकडे केवळ विजय-पराजयाच्या चष्म्यातून पाहणे ही मोठी चूक ठरेल. कारण मातब्बर, प्रस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या बळकट विरोधक असलेल्या मतदारसंघात टिकून राहणे, प्रचार करणे आणि लोकांपर्यंत पोहोचणे हेच मोठे यश होते. फलटण, वाई, खंडाळा यांसारख्या तालुक्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी इतकी प्रभावी लढत दिली की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसारख्या सत्ताधारी आणि मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला.

अनेक ठिकाणी वंचितच्या उपस्थितीमुळे मोठ्या पक्षांना थेट जागा गमवाव्या लागल्या. हे वास्तव वंचित बहुजन आघाडी ही केवळ “पर्यायी” नव्हे, तर “निर्णायक” राजकीय शक्ती बनू लागल्याचे स्पष्ट संकेत देणारे आहे.

तुटपुंज्या यंत्रणा, मर्यादित आर्थिक साधने आणि कोणताही सत्तेचा आधार नसतानाही वंचितच्या उमेदवारांनी गावोगावी फिरून प्रचार केला. हा प्रचार केवळ मत मागणारा नव्हता, तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाचा, सामाजिक न्यायाचा आणि बहुजन राजकारणाचा संदेश देणारा होता. लोकांशी थेट संवाद, प्रश्नांवर चर्चा आणि स्वाभिमानी राजकारणाचा आग्रह, यामुळेच वंचितची ओळख सातारा जिल्ह्यात वेगाने रुजत गेली.

आज सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी हे नाव केवळ निवडणूक लढवणारा पक्ष म्हणून नव्हे, तर चळवळीतून उभा राहिलेला एकमेव राजकीय पर्याय म्हणून घुमू लागले आहे. जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण, महिलावर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते वंचितमध्ये सहभागी होण्यास उत्सुक झाले आहेत. ही उत्सुकता केवळ राजकीय संधीसाठी नसून, स्वाभिमान, प्रतिनिधित्व आणि सामाजिक परिवर्तनाच्या अपेक्षेतून निर्माण झालेली आहे.

या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सातारा जिल्ह्यातील राजकारण आता एकांगी राहणार नाही. वंचित बहुजन आघाडीने उभा केलेला हा पाया भविष्यात अधिक भक्कम होणार असून सातारा जिल्हा वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास जनमानसात तयार झाला आहे. येणाऱ्या काळात स्थानिक प्रश्न, सामाजिक अन्याय आणि बहुजनांचे प्रश्न अधिक तीव्रतेने मांडणारी राजकीय शक्ती म्हणून वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावेल, यात शंका नाही.

_ अक्षय साळवे सातारा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments