
नाशिक : नाशिक येथील वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर दिला. या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करण्यात येईल, असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
माधवी जाधव यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दिली. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “गिरीश महाजन यांच्या वागणुकीतून नीच मानसिकता दिसून येते. हे कृत्य केवळ अपमानजनक नसून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (SC/ST Act) गुन्हा ठरू शकते.”
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पश्चिम कमिटीमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली, तर स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर कायदेशीर मसुदा तयार करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वाद निर्माण झाला. यावर उपस्थित वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता.
या घटनेनंतर माधवी जाधव यांना वंचित बहुजन आघाडीने उघड पाठिंबा दर्शवला. “आरएसएस आणि भाजपकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजन समाजाचा अवमान केला जात आहे,” असा आरोप करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध केला आहे.






