सातारा: महायुतीत एकत्रित असूनही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर येत आहे. गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकांवेळी एका मुलाखतीत एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला होता, आता पुन्हा एकदा नाईक यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय. मी आज परत बोलतो आहे, भाजपाने परवानगी दिली, तर त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू असे गणेश नाईक (Ganesh naik) यांनी म्हटले होते. त्यावरुन, आता शिवसेना नेत्यांकडून पलटवार केला जात आहे. आधी मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केल्यानंतर आता मंत्री शंभुराज देसाईंकडूनही (Shambhujraj desai) गणेश नाईकांना आक्रक शैलीत इशारा देण्यात आला आहे.
भाजपाने परवानगी दिली, तर त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू, मी आज परत बोलतो आहे. मात्र, भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केले. मनाला पटले नसले तरीही कार्यकर्त्यांनी सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला, अशा शब्दात गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला होता. आता, नाईक यांच्या टीकेला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं आहे. गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेवर शिवसेना नेते तथा मंत्री शंभुराज देसाई यांनीही आक्रमक शैलीत पलटवार केला आहे. राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते, एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार, आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या टीकेला प्रत्त्युतर दिलं आहे.
पद्म पुरस्कार व महाराष्ट्राचा सन्मान
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यावरुन विचारलेल्या प्रश्नावरही शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं.
केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या “महाराष्ट्राचा सन्मान” मोहिमेअंतर्गत पद्म पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. पद्म पुरस्कार हे कोणत्याही राजकीय शिफारशीवर नव्हे, तर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यभराच्या कार्याचा, सामाजिक योगदानाचा आणि राष्ट्रासाठी केलेल्या सेवेचा सखोल अभ्यास करून दिले जातात. या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ज्येष्ठ मान्यवरांवर राजकीय टीका करणे हे महाराष्ट्राच्या सन्मानालाच धक्का देणारे आहे, असेही शंभुराज देसाई यांनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा








