फलटण तालुक्याला ३० वर्षांनंतर खरे स्वातंत्र्य – जयकुमार गोरे यांची पाडेगावातून घणाघाती घोषणा

0
28
फलटण तालुक्याला ३० वर्षांनंतर खरे स्वातंत्र्य – जयकुमार गोरे यांची पाडेगावातून घणाघाती घोषणा


फलटण :- फलटण तालुका गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यात नव्हता, तर पारतंत्र्यातच होता. मात्र सन २०२५ मध्ये तालुक्याला खरे स्वातंत्र्य मिळाले असून आता सामान्य जनतेला विकासकामांसाठी कुणाच्या वाड्यावर मुजरा करण्याची गरज उरलेली नाही, असे ठाम प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले.

पाडेगाव येथे आयोजित भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ना. गोरे म्हणाले,
“पाटणवरून कुणीही येवो, काहीही बोले—काळजी करण्याचे कारण नाही. डीपीडीसीमधून एक रुपया जरी मिळाला नाही तरी चालेल, त्याच्या दहा पट निधी ग्रामविकास विभागातून देण्याची ताकद माझ्यात आहे.”

विरोधकांवर जोरदार टीका
विरोधकांवर, विशेषतः राजे गटावर सडकून टीका करताना ना. गोरे यांनी तरडगाव जिल्हा परिषद गटाचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले,
“सलग २५ वर्षे मंत्रीपद व पालकमंत्रीपद भूषवूनही जर शिंदे माळ येथे साधा डीपी देता आला नसेल, तर नेमका कसला विकास केला? १५ वर्षे आमदार राहूनही गावचा विकास होत नसेल, तर सत्ता केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठी वापरली, हेच सिद्ध होते.”
तरडगाव जिल्हा परिषद गटाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून द्या, मी या गटासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.

रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
“ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील सांगतील तेवढा निधी मंजूर करण्याची ताकद आमच्यात आहे. मी फक्त ग्रामविकास मंत्री आहे; खरे मंत्री रणजितसिंह नाईक निंबाळकरच आहेत,” असे सांगत ना. गोरे यांनी रणजितसिंहांच्या नेतृत्वावर स्पष्ट शिक्कामोर्तब केले.

ही निवडणूक ग्रामविकास खात्याची – जयकुमार गोरे
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,
“ही निवडणूक म्हणजे ग्रामविकास खात्याची निवडणूक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सर्व संस्था ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे गावाचा विकास हवा असेल, तर रणजितदादा आणि भाजपाच्या पाठीशी ठाम उभे राहा.”

विरोधकांचा ‘सुपडा साफ’ होणार – रणजितसिंह नाईक निंबाळकर
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे फलटण तालुक्याच्या विकासासाठी खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. आमदार सचिन पाटील यांनी प्रशासन थेट गावोगावी नेले. या निवडणुकीत तरडगावसह संपूर्ण तालुक्यातून विरोधक संपुष्टात येतील.”

८ जिल्हा परिषद गट, १६ पंचायत समिती गणांमध्ये महायुतीचा विजय – सचिन पाटील
आमदार सचिन पाटील म्हणाले,
“तरडगाव जिल्हा परिषद गटासह फलटण तालुक्यातील सर्व ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे.”
या मेळाव्यास पाडेगाव व परिसरातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.