
फलटण | प्रतिनिधी :- फलटण तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) यांची महायुती प्रचारात अधिक आक्रमक होताना दिसत आहे. आगामी निवडणुकीचा धुराळा उडवून देण्यासाठी महायुतीच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता पाडेगाव (ता. फलटण) येथे होणार आहे.
या भव्य प्रचार शुभारंभाचे उद्घाटन राज्याचे मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून, पाडेगाव येथून संपूर्ण ग्रामीण भागात महायुतीची ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला जाणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील राजकीय चढाओढीत महायुती आपली ठाम भूमिका मांडणार असून, विकासकामे, शासकीय योजना, तसेच फलटण तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीचा अजेंडा थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला महायुतीचे तालुकास्तरीय पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाडीचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांकडून दिले जात असून, पाडेगाव येथून सुरू होणाऱ्या या प्रचारामुळे संपूर्ण फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.








