
फलटण :- फलटण शहराचा विकास आता वेगाने होणार असून शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मंत्री जयकुमार गोरे यांनी शहर व तालुक्याचे सक्षम ‘वकीलपत्र’ घेतले असल्याने विकासकामांना गती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. “आज मी फलटणकरांना शब्द देतो की येत्या सहा महिन्यांत फलटण शहर १०० टक्के खड्डेमुक्त (Pothole Free) केले जाईल,” अशी खणखणीत ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजकीय सौजन्य दाखवत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ. प्रियादर्शनी रणजितसिंह भोसले यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे यांच्यासह विरोधी गटातून निवडून आलेले युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचेही मनापासून अभिनंदन केले.
आमदार सचिन पाटील म्हणाले, “लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्णत्वास नेण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रत्येक विकासात्मक निर्णयात आम्ही ठामपणे सोबत राहू.”
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत सांगितले, “फलटण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रणजितदादांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवकांची टीम सज्ज आहे. नगरपालिका ही कुणाच्याही खासगी मालकीची नसून ती सर्वसामान्य जनतेची आहे, हे विसरू नये.”
कार्यक्रमाचे आभार नवनियुक्त उपनगराध्यक्ष सौ. प्रियादर्शनी रणजितसिंह भोसले यांनी मानले. यावेळी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








