
फलटण :- जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखरवाडी जिल्हा परिषद गटातील राजकीय घडामोडींना वेग आला असून वंचित बहुजन आघाडीच्या सौ. प्रतीक्षा रोहन मोहिते यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे साखरवाडी गटातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून निवडणूक वातावरण अधिक तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतीक्षा मोहिते यांनी सामाजिक न्याय, महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे हित, युवकांचे शिक्षण व रोजगाराच्या संधी तसेच गावपातळीवरील मूलभूत सुविधा सक्षम करण्यावर आपला भर राहणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. साखरवाडी गटात विविध राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे. येत्या काळात प्रचाराला वेग येणार असून प्रतीक्षा रोहन मोहिते यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे.








