साडेचार तास यकृत शरीराबाहेर अन् 2 वर्षांच्या चिमुरडीला नवजीवन; भारतातील पहिली शस्त्रक्रिया परळच्या वाडीया रुग्णालयात!

0
11
साडेचार तास यकृत शरीराबाहेर अन् 2 वर्षांच्या चिमुरडीला नवजीवन; भारतातील पहिली शस्त्रक्रिया परळच्या वाडीया रुग्णालयात!


Surgery: अवघ्या 2 वर्षांच्या अफ्सा हिला गंभीर अशा यकृत कर्करोगाचे निदान झाले होते. यकृताच्या आत आणि भोवतालच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत हा कर्करोग पोहोचल्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रिया करणे  अशक्य होते. परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये मात्र या बालरुग्णाला आशेचा किरण मिळाला असून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.भारतामध्ये प्रथमच, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अफ्सावर दुर्मीळ आणि अत्यंत गुंतागुंतीची Ex-situ म्हणजेच शरीराबाहेर केली जाणारी शस्त्रक्रिया) यकृत ॲाटो ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

अफ्साच्या आईला अफ्साच्या पोटात सूज जाणवली आणि त्यानंतर तिने त्वरित वैद्यकिय मदत घेत तिची तपासणी करुन घेतली. त्यानंतर ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुदलियार यांनी अफ्साला गंभीर ‘हेपॅटोब्लास्टोमा’ असल्याचे निदान केले. हेपॅटोब्लास्टोमा हा बालकांमधील सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या यकृत कर्करोगांपैकी एक आहे. मात्र, अफ्साच्या बाबतीत हा कर्करोग यकृताच्या मध्यभागी असल्याने आणि यकृताच्या आत व आजूबाजूच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरल्याने, शस्त्रक्रिया करणे अत्यंत अवघड आणि जोखमीचे होते.
 
पारंपरिक शस्त्रक्रियेद्वारे हा कर्करोग समूळ नष्ट करणे शक्य नसल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी नावीन्यपूर्ण Ex-situ यकृत ॲाटो ट्रान्सप्लान्ट लिव्हर सर्जरीचा मार्ग निवडला, ज्याची पुढे वैद्यकीय इतिहासात नोंद झाली.
 
निदानानंतर, सुरुवातीच्या केमोथेरपीमुळे गाठीचा आकार काही प्रमाणात कमी झाला, परंतु गाठीचे स्थान आणि महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये तिचा समावेश असल्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. यकृत प्रत्यारोपण हा उपचारांचा सर्वोत्तम पर्याय ठरला असून , केमोथेरपीनंतर कमी कालावधीत दात्याचे (जिवंत किंवा मृत) अवयव उपलब्ध नसल्यामुळे हा पर्याय अशक्य ठरला. केमोथेरपीमुळे गाठीचा आकार कमी झाला असूनही, गाठीने यकृतातून होणारा रक्तप्रवाह पूर्णपणे रोखला होता, ज्यामुळे संपूर्ण यकृत काढून टाकणे आणि रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करणे आवश्यक होते, जे पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धतींनी शक्य नव्हते. 
 
बाळाचे यकृत आकाराने लहान असून त्याचे वजन सुमारे 500 ग्रॅम होते. त्यामुळे संपूर्ण यकृत कोणतीही हानी न होता शरीराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुर्मिळ एक्स-सिटू (शरीराबाहेरील) शस्त्रक्रिया तंत्रामध्ये रुग्णाच्या शरीरातून संपूर्ण यकृत बाहेर काढण्यात आले, त्यानंतर शरीराबाहेरच  4.5 तास थंड तापमानात ते सुरक्षित केले गेले. यामुळे ट्यूमरने बाधित यकृत काढून टाकण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करण्याची संधी मिळाल्याचे यकृत प्रत्यारोपण आणि हेपॅटोबिलिअरी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक माथूर सांगतात.

हे पूर्ण झाल्यावर, पुनर्रचना केलेला उर्वरित निरोगी यकृताचा भाग पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आला. या फायद्यांव्यतिरिक्त, शरीराबाहेर असताना यकृताला होणाऱ्या दुखापतीमुळे या पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान आजारपण आणि मृत्यूचे प्रमाणही अधिक असते. हे धोके कमी करण्यासाठी, आम्ही एक्स-सिटू ऑक्सिजनेटेड हायपोथर्मिक मशीन प्रिझर्वेशनचे नवीन तंत्रज्ञान वापरले, जे शरीराबाहेर देखील यकृताला रक्तपुरवठा करते आणि त्याला थंड ठेवते, ज्यामुळे यकृताची दुखापत कमी होते, असे त्यांनी पुढे सांगितले. ही पद्धत यकृताच्या कर्करोगासाठी क्वचितच वापरली जाते, आणि आमच्या सध्याच्या माहितीनुसार, मुलांमध्ये आतापर्यंत ती कधीही वापरलेली नसल्याचेही डॉक्टरांनी यावेळी सांगितले.





Source link