
कोळकी (ता. फलटण) : माने परिवाराच्या वतीने परित्राण पाठ व धम्मदीक्षा समारंभ रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी कोळकी येथे अत्यंत श्रद्धा, शांतता व धम्ममय वातावरणात संपन्न झाला. या पवित्र कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता धम्मदीक्षेने झाली. भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते व सरचिटणीस बाबासाहेब जगताप यांनी माने परिवाराच्या वतीने भंते काश्यप यांच्याकडे त्रिसरण व पंचशील प्रदान करण्याची याचना केली. त्यानुसार भंते काश्यप यांनी संपूर्ण माने परिवारासह धम्मदीक्षेसाठी उपस्थित असलेल्या सर्व अनुयायांना त्रिसरण व पंचशील प्रदान केले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने संरक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे संस्कार सचिव अमोल काकडे, संघटक अरविंद निकाळजे, विजयकुमार जगताप उपस्थित होते.
यानंतर भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते व सरचिटणीस बाबासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धपूजा, भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिलेल्या २२ धम्म प्रतिज्ञा संपूर्ण माने परिवारासह धम्मदीक्षा घेणाऱ्या सर्वांना दिल्या. उपस्थितांनी त्या प्रतिज्ञा श्रद्धेने स्वीकारल्या. यावेळी 11 उपासक उपासिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
यावेळी भंते काश्यप यांनी परित्राण पाठाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करताना, धम्माच्या आचरणात परित्राण पाठ कसा मानसिक शांती, संरक्षण व सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो, याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर माने परिवाराच्या निवासस्थानी भंते काश्यप यांच्या हस्ते परित्राण पाठाचे पठण करण्यात आले व परिवारासाठी मंगल आशीर्वाद व्यक्त करण्यात आले.
किशोर रामचंद्र माने, पोर्णिमा किशोर माने, मंथन किशोर माने, देवांग किशोर माने, सुहास रामचंद्र माने, रजनी सुहास माने, रिहान सुहास माने, सुहान सुहास माने तसेच बेबीनंदा रामचंद्र माने यांनी परित्राण पाठाच्या माध्यमातून आशीर्वाद स्वीकारले.
हा कार्यक्रम कोळकी (ता. फलटण) येथील माने परिवाराच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर माने परिवाराच्यावतीने भोजनाची व्यवस्था शाहू–फुले–आंबेडकर सभागृह, कोळकी येथे करण्यात आली होतो.
धम्म, समता, करुणा व बंधुत्वाचा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.








