२४ तासांत महामार्गावरील दरोडा उघडकीस; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
69
२४ तासांत महामार्गावरील दरोडा उघडकीस; २० लाखांचा मुद्देमाल जप्त


साहस Times  | प्रतिनिधी :-  कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीत महामार्गावर झालेल्या गंभीर दरोड्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत तब्बल २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीस वाहनाद्वारे धडक देऊन जखमी करण्यात आले. त्यानंतर महामार्गावर दरोडा टाकून आरोपींनी आठ लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने लंपास केली होती. या प्रकरणी कुरुंदा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), ३११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मोहन बाळासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. अवघ्या २४ तासांत आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम रुपये ६ लाख ७० हजार, तसेच गुन्ह्यात वापरलेले एक पिकअप वाहन व तीन मोटारसायकली असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.