फलटण तालुक्यात अपघाताचा बनाव करून इसमाचा खून; अवघ्या ४ तासांत दोन आरोपी अटकेत

0
101
फलटण तालुक्यात अपघाताचा बनाव करून इसमाचा खून; अवघ्या ४ तासांत दोन आरोपी अटकेत


फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील सस्तेवाडी हद्दीत अपघाताचा बनाव करून एका इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बाळु मदने (वय ४०, रा. सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची खबर उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथून प्राप्त झाल्यानंतर अकस्मात मयत रजिस्टर नंबर ०१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचे थारोळे आढळून आले. तसेच मयताची मोटारसायकल साईड स्टॅण्डवर सुस्थितीत उभी असून तिच्या स्विचमध्ये चावी असल्याचे निदर्शनास आले. या संशयास्पद बाबींमुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, काही वेळापूर्वी शेतात ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांबरोबर गणेश मदने यांचे भांडण झाल्याची माहिती मिळाली. मध्यरात्री निर्जनस्थळी घटना घडल्याने तांत्रिक तपासाला मर्यादा होत्या, तरीही गोपनीय बातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास अधिक वेगाने पुढे नेला.
अखेर अवघ्या चार तासांत रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) व गणेश शंकर जाधव (वय २२, सध्या रा. सोमवार पेठ, फलटण, मुळ रा. विद्यानगरी, मुंबई) या दोघांना आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आले. परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप करीत आहेत.