
फलटण प्रतिनिधी :- बरड जिल्हा परिषद गटातील निंबळक गावच्या सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरण चळवळीला नवे नेतृत्व मिळावे, या उद्देशाने राजे गटाकडून मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी होत आहे. शिक्षण, समाजसेवा व महिला सबलीकरण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सौ. वैशाली कांबळे या उच्चशिक्षित असून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर मिळाले आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थांकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
निंबळक, बरड जावली, आंदरुड, गुणवरे, नाईकबोंबवाडी, शेरे शिंदेवाडी, पिंप्रद, मठाचीवाडी, वाजेगाव, टाकळवाडा, राजाळे, साठे फाटा, मुंजवडी, कुरवली आदी गावांमध्ये त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व मानवी सेवेतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण व सबलीकरण ही काळाची गरज ओळखून गेल्या वीस वर्षांपासून राजे गटाच्या माध्यमातून पूर्व भागात अविरत कार्य सुरू आहे.
दर रविवारी निंबळक येथे महिलांसाठी विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये आरी वर्क, नथ मेकिंग, इमिटेशन ज्वेलरी, मसाले बनवणे, रांगोळी मॅट, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, विविध खाद्यपदार्थ निर्मिती यांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवले आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक व महिलांसाठी विविध महामंडळांच्या माध्यमातून कर्ज योजना, रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत योजना, शिष्यवृत्ती योजना, संजय गांधी निराधार योजना, मेडिक्लेम व विमा योजना, घरकुल आवास योजना, इमारत बांधकाम कामगार योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना आदींचा लाभ पात्र लाभार्थ्यांना विनामूल्य विना मोबदला मिळवून देण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घटस्फोटीत, विधवा व परितक्त्या महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळात गरजू नागरिकांना अन्नधान्य व औषध किट वाटप करण्यात आले. तसेच सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे व मदतीचा हात पुढे करण्यात आला.
अशा सर्वसमावेशक व लोकाभिमुख कार्यामुळे सौ. वैशाली कांबळे या बरड जिल्हा परिषद गटासाठी सक्षम, संवेदनशील व विकासाभिमुख नेतृत्व ठरतील, असा विश्वास व्यक्त होत असून राजे गटाकडून त्यांच्या उमेदवारीसाठी सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.








