फलटणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष; समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

0
38
फलटणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष; समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

फलटण प्रतिनिधी :- सातारा येथे आज जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात फलटण शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण नगरपालिकेतील सर्व विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय भाजपा सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी, विविध लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मिळालेले यश हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फलटण शहरासह सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव काम करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सत्कार समारंभामुळे सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात संघटन मजबूत करून विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.