
फलटण प्रतिनिधी : फलटण नगरीत आज भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक समतेचे दर्शन घडले. नूतन नगराध्यक्ष समशेरदादा व सौ. मनीषा वहिनीसाहेब यांनी फलटण येथील श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, दक्षिण काशी येथे आयोजित नागपूर सदभक्त मंडळ व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पंचावतार उपहार वार्षिक महोत्सवात भक्तीभावे सहभाग नोंदवला.
सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना नगराध्यक्षांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सर्वसामान्य भाविकांप्रमाणे पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच उपस्थित साधुसंत, महंत व आचार्यगणांचे आशीर्वाद घेतले. या भक्तीमय वातावरणात नगराध्यक्ष अक्षरशः भक्तीरंगात रंगून गेले होते.
या प्रसंगी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने आचार्य बाबाजी व सुदामराज बाबा यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे, जय ज्योती नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ. माधुरी ननावरे, श्री शंभूराज बोबडे, श्री सुमित चोरमले, श्री अजित गायकवाड सर तसेच नागपूरकर संत-महंत व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे यांनी केले.








