
Watching Reels While Eating: मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे, असं वाक्य एका मराठी चित्रपटात आहे. खरोखरच आज मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. म्हणजे अगदी छोट्या-मोठ्या कामांसाठी ही पाच इंचाची स्क्रीन आपल्याला आपल्या हातात किंवा खिशात हवीच असते. मग ते फोन कॉलसारखं बेसिक फिचर असो किंवा अगदी जेवताना रिल्स बघणं असो, मोबाईल मस्ट आहे!
सगळं काही रील स्क्रोल करत
आपल्यापैकी अनेकजण जेवताना किंवा इतर छोटी-मोठी काम करताना जसं चहा पिताना गैरे निवांत रील स्क्रोल करत बसलेलो असतो. हल्ली ही सवय फार सामान्य झाली आहे. तुम्ही हॉटेलमध्ये बघा किंवा ऑफिस कॅन्टीनमध्ये बघा सगळीकडे अशी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली मंडळी दिसतील. मात्र ही सवय अगदी सहज सोपी कृती असून दैनंदिन जीवनाचा भाग झालेली असली तरी त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. एका नव्या संशोधनामधून हे सिद्ध झालं आहे.
कोणी केलाय हा अभ्यास?
‘हेल्थलाइन’मधील एका आरोग्यविषय अहवालानुसार, बीजिंग विद्यापीठाने रिल्स स्क्रोल करण्यासंदर्भातील विषयावर एक अभ्यास केला. या अभ्यासाच्या निष्कार्षांमधून असे दिसून आले की जेवताना मोबाईल फोन वापरणे किंवा टीव्ही पाहणे शरीरावर फारच नकारात्मक परिणाम करतं.
अहवालात काय होते?
बीजिंग विद्यापीठातील या संशोधनातून असे दिसून आले की, जेवताना मोबाईल फोन वापरणे किंवा टीव्ही पाहिल्याने आपलं लक्ष अन्नापासून विचलित करते. अशाप्रकारे पूर्ण लक्ष अन्नावर न ठेवता ते सेवन केल्याने आपल्या मेंदूला जेवल्याचं समाधान मिळत नाही. आपला मेंदू फोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठीही बरीच ऊर्जा खर्च करतो. यामुळेच जेवणानंतर तृप्ततेचा संकेत देणाऱ्या हार्मोन्सचे योग्यरित्या उत्सर्जित होत नाहीत. परिणामी, व्यक्तीची भूक हळूहळू कमी होते.
काय परिणाम होतात?
जेवताना लक्ष विचलित झाल्यामुळे अन्नाच्या सुगंधाची आणि चवीची जाणीव कमी होऊ शकते. यामुळे हळूहळू खाण्याचा आनंद कमी होतो. याचा दुरोगामी परिणाम असा होतो की लोक प्रक्रिया केलेले आणि बाहेरील अन्न पसंत करू लागतात. या पद्धतीनं बराच काळ राहिल्यास चयापचयावर परिणाम होतो, ज्यामुळे शेवटी आरोग्य बिघडते. यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो.
या समस्याही बळावतात
जेवणादरम्यान जास्त स्क्रीन टाइममुळे केवळ लठ्ठपणाच वाढतो असे नाही तर मधुमेह, उच्च रक्तदाब या सारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका देखील वाढतो. याचसंदर्भातील अजून एक समस्या म्हणजे एकाग्रतेचा अभाव! हल्ली हा अभाव लोकांमध्ये खूप दिसून येतो. या एकग्रतेच्या अभावामुळे एक तर लवकर किंवा खूप हळू जेवण जातो. यामुळे टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका वाढतो. शिवाय, याचा जीवनशैलीवरही परिणाम होतो.
आता हे एवढे तोटे पाहता जेवताना मोबाईल दूर ठेवलेलाच बरा, नाही का?








