
बिजवडी : कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी कु. गौरी लक्ष्मण महानवर (इयत्ता सातवी ‘ब’) हिने आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. गौरी हिने आपल्या विषयाची सखोल मांडणी, स्पष्ट उच्चार, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण व प्रभावी विचारांमुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.
कु. गौरीच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासू वृत्ती तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के,सर्व स्कुल कमिटी सदस्य, जनरल बॉडी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच सर्व विद्यार्थी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कु. गौरीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही वक्तृत्व, अभिव्यक्ती आणि स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची शिखरे गाठो, हीच विद्यालयाच्या वतीने सदिच्छा.








