फलटणमध्ये शिवसेना व राजे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ ; पालकमंत्री शंभुराज देसाई याच्या हस्ते

0
24
फलटणमध्ये शिवसेना व राजे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ ; पालकमंत्री शंभुराज देसाई याच्या हस्ते

फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात सध्या पसरलेल्या दहशतीच्या वातावरणाला आळा घालण्यासाठी शिवसेना, राजेगट राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णा भिमा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीराम मंदिराजवळ करण्यात आला. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थितांना आश्वस्त करत सांगितले की, “फलटण शहरातील नागरिकांना निर्भयपणे जगता यावं, असे मोकळे आणि निर्मळ वातावरण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आपण निर्माण करणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्या नावाला साजेसा विजय मिळवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”

सभेत माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, काँग्रेसचे सचिन सूर्यवंशी बेडके, शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.

फलटणच्या राजे परिवाराने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचा आनंद व्यक्त करत ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले, “नगरपालिकेच्या निवडणुकीत राजे गटाला डावपेच सांगण्याची गरज नाही. लोकांची सेवा करण्याची परंपरा या कुटुंबाकडे आहे. 28 तारखेला एकनाथ शिंदे फलटणला येणार आहेत. त्यांच्या रुपाने राज्याचे नगरविकास खाते फलटणला येणार आहे.” याशिवाय, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कडक शासन होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, “श्रीमंत रामराजेंनी फलटण तालुक्याला विकासाची दिशा दिली आहे. फलटण शहर एक नामांकित आणि सुसंस्कृत शहर आहे. या शहराचा विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत सर्व गेलो आहोत. इथली दहशत संपवणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची तुलना अन्यांशी होऊ शकत नाही; आमचे उमेदवार सुशिक्षित आणि तरुण आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शहराचा विकास होईल, असा विश्वास आम्हाला आहे.”

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “शिवसेनेच्या माध्यमातून आता आपण वेगळ्या दिशेने निघालो आहोत. फलटण, सातारा, कराड आणि पाटण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा निर्णायक निकाल येतात. खंबाटकी घाटाच्या अलिकडचा संपूर्ण भाग भगवा करणे हा आमचा उद्देश आहे. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली असुरक्षतेची भावना समुळ नष्ट होईल, आणि प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम चालू राहील.”

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, “फलटणला रामराजेंनी घालून दिलेली शांतता आणि सुसंस्कृतपणाची घडी विस्कटू नये. शहर व तालुक्याला योग्य दिशेने नेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता जे काही बरे-वाईट होईल, ते शिवसेनेतच होईल. नगराध्यक्षपदासाठी श्रीमंत अनिकेतराजे हे चांगले उमेदवार आहेत. फलटणमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कधीही भासणार नाही. शेती आणि उद्योगासाठी आवश्यक कामे केली जातील. कार्यकर्त्यांनी ही कामे ठासून सांगितली पाहिजेत. ताकदीने निवडणूक पार पाडून चांगल्या मताधिक्याने जिंकणे हे आपले उद्दिष्ट आहे.”

नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे यांनी प्रतिज्ञा केली की, “फलटणसाठी पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी कामे केली जातील. शहरातील पसरलेले भितीचे वातावरण संपवले जाईल, तसेच शासकीय यंत्रणांचा झालेला गैरवापर थांबविला जाईल.”

यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, शिवसेनेचे शरद कणसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनीही भाषणे केली. आभार आभार मिलींद नेवसे यांनी मानले.