कोणतेही मोठे काम टिकून राहण्यासाठी एक भक्कम रचना आवश्यक असते. फक्त उत्साहाने वर्षानुवर्षे काम सुरू ठेवता येत नाही.” – मॅक्सिन बर्नसन

0
116
कोणतेही मोठे काम टिकून राहण्यासाठी एक भक्कम रचना आवश्यक असते. फक्त उत्साहाने वर्षानुवर्षे काम सुरू ठेवता येत नाही.” – मॅक्सिन बर्नसन


फलटण प्रतिनिधी :- प्रगत शिक्षण संस्थेच्या ४० वर्षपूर्तीनिमित्त फलटणच्या भूमीवर भरलेल्या या सोहळ्यात, जणू चार दशके जपलेले स्वप्न, संघर्ष आणि जिद्दीचे प्रतिबिंबच साकार झाले होते. मनात भावनांची ओल, डोळ्यांत कृतज्ञतेची चमक, आणि सभागृहात एक अदृश्य पण जाणवणारा उत्साह अशा वातावरणात संस्थेच्या संस्थापक, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. मॅक्सिन बर्नसन यांनी आपल्या मनातील सत्य शब्दांच्या स्वरूपात व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “कोणतेही मोठे काम टिकून राहण्यासाठी एक भक्कम रचना आवश्यक असते. फक्त उत्साहाने काम पुढे नेता येत नाही.”आणि त्यांनी पुढे जोडले.
“A structure that will last. Enthusiasm alone can’t keep you going for years. But structure will remain.”
त्या क्षणी त्यांच्या आवाजातील गांभीर्य आणि डोळ्यांतील शांत तेज पाहून संपूर्ण जमलेला माजी विद्यार्थी आणि शिक्षक समुदाय थोडा क्षण नि:शब्द झाले. कदाचित ती वाक्यं ४० वर्षांच्या संस्थात्मक प्रवासाचा सार होता. योजनाबद्धता, चिकाटी आणि माणसांबद्दलची नि:स्वार्थ आस्था.त्या पुढे म्हणाल्या, “योग्य रचना दीर्घकाळ टिकते. उपक्रमाला स्थैर्य, सातत्य आणि आत्मा देण्यासाठी भक्कम पाया असणे अत्यावश्यक आहे.” त्यांच्या प्रत्येक शब्दामागे आयुष्यभराच्या अनुभवाची शिदोरी होती.शैक्षणिक तत्त्वज्ञानाबद्दल बोलताना त्या एकदम सौम्य झाल्या. जणू काही फुलाच्या पाकळ्यांसारख्या त्यांचा शब्दांचा स्पर्श सभागृहावर उमटत होता. त्या म्हणाल्या, “माझं स्वप्न खूप साधं आहे.कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळा मुलांची भीती वाढवणारी इमारत नसावी; ती त्यांच्या कल्पनांना दिशा देणारा, त्यांच्या आत्मविश्वासाला पंख देणारा एक खुला आकाश असावा.”त्या पुढे म्हणाल्या, “शिक्षण म्हणजे मुलांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद देणं. मुलं शाळेत केवळ उपस्थित राहण्यासाठी नसतात. त्यांनी आपल्या शब्दांत, आपल्या भाषेत, आपल्या अनुभवातून स्वतःला व्यक्त करता येणं आवश्यक आहे. भाषा, बोली आणि अनुभव हीच त्यांची खरी ओळख आहे. हा पाया मजबूत असेल तर ते कोणत्याही संकटातून उभं राहू शकतात.”गेल्या ४० वर्षांत प्रगत शिक्षण संस्थेने केलेले काम म्हणजे फक्त उपक्रमांची यादी नाही. तर हजारो हृदयांमध्ये उजेड पेरण्याची कहाणी आहे. अनेक जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद प्राथमिक शाळा, अंगणवाड्या आणि शिक्षक यांच्यासाठी ही संस्था आशेचा दिवा ठरली आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. मंजिरी निंबकर यांनी संस्थेच्या जमीनीवरील कामाचा जिवंत इतिहास सांगितला. फलटण, माण आणि औसा तालुक्यातील शाळांमधील प्रयोग, शिक्षक प्रशिक्षण, भाषिक उपक्रम, आणि मुलांच्या गरजांकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टीकोन. त्या म्हणाल्या, “आमची शाळा ही एक प्रयोगशाळा आहे. इथले प्रयोग म्हणजे केवळ सिद्धांत नाही. ते मुलांच्या जीवनात भिनलेले अनुभव आहेत.” या सत्राचे संयोजन संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले यांनी केले आणि त्यांनी त्यांच्याच डॉ.मक्सीन बर्नसन यांच्यावरील स्वप्नवेडी या कवितेने सत्राची सांगता करून सत्र अधिक भावनिक केले.
कार्यक्रमातील “माणसं घडवणारा आणि जोडणारा” हा सत्राचा भाग तर अविस्मरणीय ठरला. जेव्हा माजी व विद्यमान शिक्षक, बालवाडी सेविका, कर्मचारी, ग्रंथपाल, माजी विद्यार्थी आणि अगदी आजी विद्यार्थिनीही आपल्या आठवणी सांगू लागल्या. तेव्हा शब्द नव्हे, तर भावना बोलत होत्या.अनिता कुलकर्णी, निलोफर शेख, आशा चव्हाण, माधुरी भगत, प्रदीप ढेकळे, ऍड. श्याम अहिवळे, प्रितम पवार, राजेश्वरी भिरंगी प्रत्येकाने सांगितलेली आठवण म्हणजे जणू या संस्थेच्या मनातील एका कड्यावरून उघडलेली दारं होती. अनेकांच्या आवाजात दमछाक होती, काहींच्या डोळ्यांत दाटून आलेला ओलावा होता, पण प्रत्येक कथेत एकभावना होती—“ही संस्था आमचं घर आहे. ”पुढील भागात डॉ. मंजिरी निंबकर यांनी ‘मातीत रुजलेलं आभाळ’ या पुस्तिकेतील अंश वाचले. चौथ्या बॅचमधील धनश्री (मिंटी) जोशी-दांडेकर हिचं पत्र ऐकताना मंडपातील सगळेच अंतर्मुख झाले. त्या पत्रात एक मुलगी, एक विद्यार्थीनी, एक शिक्षक, आणि एक कृतज्ञ मन सगळं एकत्र घडलं होतं. त्यानंतर ‘कहाणी प्रगत शिक्षण संस्थेची’ या फिल्मने तर संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर सजीव केला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रगत’ गीताने झाली. जे संस्थेच्या सचिव मधुरा राजवंशी यांनी लिहिलं होतं आणि बालभवनच्या मुलांनी अतिशय निरागसपणे सादर केलं. ‘आ चल के तुझे’ या गीताच्या सादरीकरणाने तर उपस्थितांच्या मनात एक वेगळाच स्पर्श उमटला. जणू काही भविष्यकाळाची हाक होती.कार्यक्रमाला झिया कुरेशी, डॉ. चंदा निंबकर, नीलिमा गोखले, डॉ. नंदिनी निंबकर, ऑस्ट्रेलियन हितचिंतक गॅवन ब्रोमिलो, पर्यावरणप्रेमी सुनील करकरे, प्राचार्य डॉ. सुधीर इंगळे, आबा करडे, रणजित कोकाटे, दत्ता अहिवळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका दीपा हेंद्रे, विजय केंकणे आणि आजी-माजी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे यांनी इतक्या सहजपणे, इतक्या नेटकपणे केले की कार्यक्रमाचा प्रवाह गुणवत्ता आणि आत्मीयता दोन्ही जपून ठेवला. अखेरीस, कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ने झाली जणू काही चार दशकांच्या प्रवासावर मोहर उमटवणारा शांत क्षण सगळे अनुभवत होते.