अमोल मोहितेंचा सातारा नगराध्यपदासाठी भाजपकडून अर्ज दाखल, उदयनराजे भोसलेंची अनुपस्थिती चर्चेत

0
9



सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अमोल मोहिते यांना उमेदवारी जाहीर झाली.  अमोल मोहिते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समर्थकांसह अर्ज भरला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. मात्र, दोन्ही राजेंचे मनोमिलन असताना देखील खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. अमोल मोहिते यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुवर्णा पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अमोल मोहिते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज अधिकृत त्यांनी सातारा नगरपालिकेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षपदावरून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे या दोघांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र, आज सकाळी भाजपकडून अमोल मोहिते यांची उमेदवारी जाहीर झाली आज भाजपच्या वतीने अर्ज भरण्यासाठी  शिवेंद्रराजे उपस्थित होते. मात्र, दोन्ही राजेंचे मनोमिलन असताना देखील उदयनराजे आणि त्यांचे कार्यकर्ते अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

उदयनराजे भोसले यांच्या भूमिककेड लक्ष

सातारा नगरपालिका निवडणुकीला उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजप म्हणून सामोरं जाणार आहेत. यापूर्वीच्या सातारा नगरपालिका निवडणुकीत एकाच पक्षात असलं तरी दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र आघाड्यांचं राजकारण असायचं. उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी नगरपालिका निवडणूक लढवायची. तर, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी साताऱ्यात निवडणुकीच्या रिंगणात होती. मात्र, यावेळी दोन्ही नेते भाजपमध्ये असल्यानं त्यांनी आघाडी ऐवजी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

उदयनराजे भोसले आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीच्या साताऱ्यात चर्चा

सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते यांचे नाव भाजपकडून पुढे आले मात्र यानंतर साताऱ्यात उदयनराजे भोसले  यांच्या गटामध्ये नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या झालेल्या निर्णयामुळे उदयनराजे सुद्धा नाराज आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा अमोल मोहिते यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा उदयनराजे या ठिकाणी उपस्थित नव्हते. तसेच उदयनराजेंचा कोणताही कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित नव्हता याच्यामुळे या ठिकाणी उदयनराजे गटामध्ये मोठी नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

सातारा नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उदनयराजे भोसले यांचं वर्चस्व राहिलं आहे. उदयनराजे गटाकडून संग्राम बर्गे आणि काका धुमाळ यांची नावे चर्चेत होती. जेव्हा भाजपा अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी या चार नावांचा सर्वे झाला होता यामध्ये संग्राम बर्गे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी सर्वात आघाडीवर होतं अशी सूत्रांच्या कडून माहिती मिळत होती असं असताना सुद्धा अमोल मोहिते यांना उमेदवारी कशी गेली याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या झालेल्या निर्णयावर उदयनराजे काय प्रतिक्रिया देतायेत ते नाराज आहेत की त्यांच्या सहमतीन हा निर्णय झालाय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 साताऱ्यात जागा वाटपासंदर्भात एका फॉर्म्युल्याची चर्चा सुरु होती, त्यात 22 जागा उदयनराजे भोसले यांच्याकडे, 22 जागा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाकडे तर 6 जागा मूळ भाजपला मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र, थेट नगराध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अमोल मोहिते यांना उमेदवारी जाहीर झाली. याशिवाय कोणताही जागा वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत नव्हता असं म्हणत जिथं ज्यांची ताकद जास्त तिथले उमेदवार दोघांचे असं सांगण्यात आल्याची चर्चा आहे.. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल करताना उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link