
फलटण | प्रतिनिधी :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २६ ऑक्टोबर रोजी फलटण दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. ही माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
फडणवीस यांच्या दौर्यात मंजूर झालेली व पूर्णत्वास आलेली विकासकामे केंद्रस्थानी असणार आहेत. या प्रकल्पांमुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे.
या दौऱ्यादरम्यान भाजपमध्ये काही नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दौरा राजकीय घडामोडींनाही गती देणारा ठरण्याची चिन्हे आहेत.
तसेच, मुख्यमंत्री फडणवीस फलटण तालुक्यासाठी विशेष घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्याच्या विकासासाठी नव्या प्रकल्पांची किंवा निधीच्या घोषणांची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.








