
कोळकी (प्रतिनिधी) : बुद्ध विहार, कोळकी येथे 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्षा आयु. सुजाता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय असी. स्टाफ ऑफिसर (SSD), महाराष्ट्र राज्य संघटक व सातारा-पुणे जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करून धम्मध्वजास मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अरुण गायकवाड यांनी केले. सुरुवातीला तालुकाध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व विशद करून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
आयु. प्रा. शिवाजी सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा उपासकांनी धम्म सांगण्याच्या भरणतीत न पडता संस्थेची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा असे सांगितले. गावा-गावात शाखा विस्तार, सभासदवाढ व जनसंपर्काचे कार्य संस्थेने हाती घ्यावे आणि धम्मप्रसारासाठी थेरो-भन्तेंची मागणी करावी असे त्यांनी स्पष्ट केले.
फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे अध्यक्ष आयु. अशोकराव भोसले यांनी सामाजिक व राजकीय चळवळीची दशा-दिशा यावर भाष्य करताना सध्या सुरू असलेल्या पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेकडे लक्ष वेधले. बौद्ध व संविधान समर्थक पदवीधरांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून एक मजबूत दबावगट निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय असी. स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दल उभारणीचे महत्त्व अधोरेखित करून सर्व पदाधिकारी, बौद्धाचार्य, श्रामनेर व माजी श्रामनेर यांनी सैनिक बनून समाजकार्यात योगदान द्यावे, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आयु. सुजाता गायकवाड यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व अधोरेखित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथेच धर्मांतराचा ऐतिहासिक निर्णय का घेतला, हे स्पष्ट केले. “धम्मकार्यात महिलांची सक्रिय भागीदारी ही काळाची गरज आहे. हम भी कुछ कम नहीं या उक्तीप्रमाणे स्त्रियांनी पुढे येऊन प्रत्येक गावात महिला शाखा स्थापन करावी. जिच्या हाती धम्माची दोरी, ती जगाचा उद्धार करी” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप
जिल्हा हिशोब तपासणीस आयु. अर्जुन ननावरे यांनी आभार मानले. धम्मपालन गाथा व सरणतंय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मान्यवर व उपस्थिती
या प्रसंगी माजी अध्यक्ष आयु. शंकर कांबळे, आयु. घाडगे सर, आयु. भिकू भोसले, आबा, सुमित साळुंखे, भोसले मॅडम, मेश्राम मॅडम, अश्विनी अहिवळे मॅडम, सावंत मॅडम, कांबळे मॅडम, प्रिया सावंत मॅडम तसेच बहुसंख्य उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
:








