फलटण तालुक्यातील मनोमिलन चर्चांना पूर्णविराम?

0
25
फलटण तालुक्यातील मनोमिलन चर्चांना पूर्णविराम?

“खासदार साहेबांचा निर्णयच अंतिम असेल” – अशोकराव जाधव यांची ठाम भूमिका

फलटण (प्रतिनिधी):  गेल्या 15 दिवसांपासून फलटण तालुक्यात सुरु असलेल्या मनोमिलनाच्या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळणार असल्याचे मत नगरसेवक व गटनेते श्री. अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले आहे. “या चर्चांवर खासदार गटातील एकाही कार्यकर्त्याचा विश्वास नाही, कारण आमचा विश्वास हा पूर्णपणे मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जाधव यांनी सांगितले की, “खासदार साहेब कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊनच कोणताही निर्णय घेतात. त्यामुळे कुठलाही अंतिम निर्णय येण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”

श्रीमंत रामराजेंवर जोरदार टीका

श्रीमंत रामराजे यांच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना जाधव म्हणाले की, “रामराजेंचे राजकारण हे कायम विश्वासघातकी राहिले आहे. गरज पडेल तेव्हा नेत्यांचा वापर आणि नंतर फेकून देण्याचा इतिहास फलटण तालुक्याला ठाऊक आहे.”

1995 पासून अनेक नेत्यांशी रामराजेंनी कसे वागणूक दिली याचा उल्लेख करत त्यांनी तेजराज पवार, सह्याद्री कदम, प्रल्हादराव साळुंखे, सुभाषराव शिंदे आदींचा दाखला दिला. “श्रीमंत शिवरूपराजेंसोबतही वेळ आली की वापर आणि नंतर दुर्लक्ष, हीच भूमिका बघायला मिळाली,” असा घणाघात त्यांनी केला.

रणजितदादा – एकवचनी, लढवय्या नेता

“आज फलटण तालुक्याला खऱ्या अर्थाने एकवचनी, लढवय्या आणि जनतेसाठी झटणारा नेता मिळाला आहे – मा. खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या रूपाने. तालुक्याची एकहाती सत्ता घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे,” असे जाधव यांनी ठामपणे सांगितले.

कार्यकर्त्यांनी कोणत्याही चर्चांवर विश्वास न ठेवता, खासदार साहेबांच्या अधिकृत निर्णयाची वाट पाहावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.