Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खटाव (khatav)तालुक्यातील कटगुण गावातील गोसावी वस्तीवर एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करून तिचा निर्घृण खून केल्याची ही गंभीर घटना असून, परिसरात शोककळा पसरली आहे. (Satara Crime News)
पत्नीचा खून करून पोलीस ठाण्यात हजर
या घटनेत विनोद विजय जाधव (वय 26) या तरुणाने पत्नी पिंकी विनोद जाधव (वय 21) हिच्यावर लोखंडी गजाने डोक्यावर वार करून खून केला. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतःच पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने म्हटले, “मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी गजाने खून केला आहे, तिचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे,”
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण आणि पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात पोहोचल्यावर पिंकी जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तत्काळ नातेवाईकांच्या मदतीने तिला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तीन लहान मुलांचा आधार हरपला
पिंकीला तीन लहान मुले आहेत. आईच्या मृत्यूनंतर मुलांचे भवितव्य अंधारात गेले आहे. या अमानवी घटनेमुळे गोसावी वस्ती आणि संपूर्ण कटगुण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विनोद जाधव याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा








