फलटण तालुक्यात “सेवा पंधरवडा” उपक्रमाची तयारी

0
75
फलटण तालुक्यात “सेवा पंधरवडा” उपक्रमाची तयारी

फलटण (ता.प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंती दिनांक १७ सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनांक २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यभर “सेवा पंधरवडा” आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार फलटण तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.

मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली व फलटण (अ.जा.) विधानसभा सदस्य मा. श्री. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागासह विविध शासकीय कार्यालयांच्या सहकार्याने या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

📌 उपक्रमांचे टप्पे

  • पहिला टप्पा : शिवरस्ते व पाणंद रस्त्यांचे सीमांकन करून नकाशावर नोंदी, रस्त्यांना क्रमांक देणे, विवादग्रस्त रस्त्यांसाठी “रस्ता अदालत” आयोजित करणे.
  • दुसरा टप्पा (२२ ते ३० सप्टेंबर २०२५) : “सर्वांसाठी घरे” योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जागांचे पट्टे वाटप, भूमिहीन/बेघर नागरिकांना फायदा. तसेच 200 चौ.फुटपर्यंत अतिक्रमण नियमानुसार वैध ठरविणे.
  • तिसरा टप्पा : पोटखराब क्षेत्र लागवडीस योग्य करणे, गावात एकाच नावाचे लोक असल्यास नोंद बदल, “आपले सरकार” केंद्र व स्वस्त धान्य दुकानांसाठी नागरिकांमार्फत QR कोड मूल्यांकन.

याशिवाय अॅग्रीस्टॅक नोंदणी, ई-पिक पाहणी जनजागृती, भटक्या व विमुक्त समाज तसेच कातकरी समाजासाठी शासकीय दाखल्यांचे वाटप, वारसनोंदी अद्ययावत करणे, लक्ष्मीमुक्ती योजना व छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियान यांसाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.

📍 सेवा पंधरवडा उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग, भूमिअभिलेख विभाग, पोलीस विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.