फलटण : – फलटण तालुक्यात चैन स्नॅचिंग, जबरी चोरी आणि दरोड्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीवर अखेर कडक कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील उर्फ बाळू सुरेश जाधव (वय 24) आणि निखील उर्फ काळू सुरेश जाधव (वय 25, दोन्ही रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा) या दोघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत संपूर्ण सातारा जिल्हा व लगतच्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
प्रशासनाची जलद कारवाई
टोळीवर जबरी चोरी, दरोडा, चैन स्नॅचिंग यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. वारंवार अटक आणि प्रतिबंधक कारवाई होऊनही ही टोळी गुन्हेगारी थांबवत नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता आणि कडक कारवाईची मागणी होत होती.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शाह यांच्या प्रस्तावावरून पोलिस अधीक्षक सातारा तथा हद्दपार प्राधिकरण मा. तुषार दोशी यांनी सुनावणी घेऊन आदेश जारी केला.
कारवाईमागील तपास व पुरावे
तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आर. धस यांनी चौकशी केली. सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व त्यांचे पथक – पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, बापू धायगुडे व जितेंद्र टिके – यांनी आवश्यक पुरावे सादर केले.
सणासुदीच्या काळात वाढीव सतर्कता
गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.