बारामती (साहस Times ) :- बारामती शहरातील खंडोबानगर भागात काही दिवसांपूर्वी घडलेल्या हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण शहर हादरले. वडील ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुली सई व मधुरा यांचा भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे बारामतीकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रस्ते सुरक्षेबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर बारामती प्रशासन सतर्क झाले असून तातडीने वाहतूक सुधारणा उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रांताधिकारी वैभव नावडकर, मुख्याधिकारी पंकज भुसे, वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, परिवहन आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.
प्रांताधिकारी नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार –
- बारामतीत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
- शहरात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार गतिरोधक बसवले जाणार आहेत.
- दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत.
- शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि वाहतूक पोलिसांचा समावेश असलेली वाहतूक व्यवस्थापन समिती स्थापन केली जाणार आहे.
- अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून वाहनांचा वेग मर्यादित करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली. पुण्यातील काही सामाजिक संस्थांनीही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर सर्वेक्षण सुरु केले आहे.
प्रशासन सर्व घटकांना सोबत घेऊन शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
📰 साहस Times
आपल्या भागातील वास्तव, जबाबदारीने.