फलटण – “न्यू फलटण शुगर वर्क्स कारखाना वाचवण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जे प्रयत्न केले, तेव्हा कुठे होते साळुंखे पाटील? त्यांनी हा कारखाना विकत घेतला होता, तर किती रुपयाला घेतला हे तरी स्पष्ट करावे,” असा थेट सवाल करत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी साळुंखे यांच्यावर घणाघात केला.
ग्रामपंचायत निभोरे येथे नुकत्याच झालेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपकराव चव्हाण, सौ. रेश्माताई भोसले, शंकरराव माडकर, सरपंच रेश्माताई लांडगे, उपसरपंच नवनाथ कांबळे, मुकुंद काका रनवरे, नितीन मदने व युवानेते पराग भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजीवराजे म्हणाले, “विरोधक सध्या चुकीचा प्रचार करत आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरवडी येथे जागतिक दर्जाची कमिन्स कंपनी आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्या कंपनीत स्थानिक युवकांना नोकरी मिळावी यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. मात्र निवडणुकीच्या काळात विरोधकांचा हेतूपुरस्सर गोंधळ माजवण्याचा प्रयत्न आहे. कमिन्स कंपनीसारख्या जागतिक कंपन्यांना विरोधकांच्या वागणुकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “आम्ही पैसा कमवण्यासाठी राजकारणात आलो नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या सेवेसाठी काम करत राहू. आम्हाला दंगल नकोय, सुसंस्कृत आणि विकासाभिमुख तालुका हवा आहे.” तसेच “स्वराज नंतर कूट आता कुठे?” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद काका रनवरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रमोद रनवरे तर आभार प्रदर्शन राजेंद्र रनवरे सर यांनी केले.
कार्यक्रमात सौ. रेश्माताई भोसले यांनी भाषणात विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले, “आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही आमदारकीला पाडलं, पण आम्ही तुमच्या नेत्यालाच खासदारकीला पाडलं.”