बारामती | प्रतिनिधी :- माझं काम जनतेसाठी, पण बेशिस्त वागणाऱ्यांना माफ नाही! – असे ठणकावून सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कार्यक्रमात उपस्थितांना चांगलाच इशारा दिला.
सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बारामतीला ‘मेडिकल हब’ बनवण्यासाठी सुरू असलेल्या आरोग्य प्रकल्पांची माहिती देतानाच त्यांनी बेशिस्तपणाविरोधात कठोर भूमिका घेतली.
“कधी काहीजण नियम तोडतात, रस्त्यावर कचरा टाकतात, जनावरे मोकळी फिरवतात, रॉंग साईडने गाडी चालवतात… मग त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग तो कोणीही असो – अगदी माझा नातेवाईक का असेना, त्यालाही टायरात घाला,” असा स्पष्ट दम त्यांनी दिला.
अजित पवार पुढे म्हणाले की, “माझी गाडी वळवून मी पोलिसांना सांगतो की त्याच्या गाडीवर कारवाई करा. जर कोणी चुकीचे वागले तर त्याला त्याच्या दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत.”
तसंच, बारामतीत झाडे लावली तरी जनावरे त्यावर ताव मारतात, असा अनुभव सांगत त्यांनी जनावरांच्या मालकांनाही इशारा दिला – “जनावरे मोकळी फिरणार नाहीत, नाहीतर मालकांवरच गुन्हे दाखल करू.”
आई-वडिलांचा सन्मान करण्याबाबतही त्यांनी आजच्या तरुण पिढीला संदेश दिला. “आई-वडिलांचे ऋण विसरू नका. तुम्ही त्यांच्यामुळेच आहात. त्यांच्या त्यागाचा विसर नको,” असं भावनिक आवाहन त्यांनी केलं.
बारामतीमध्ये वैद्यकीय क्षेत्रात मोठी गुंतवणूक
पवार यांनी सांगितलं की, बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलसह आयुर्वेदिक कॉलेज उभारणी सुरू आहे. बस स्थानक, वर्कशॉप, आरोग्य सेवा यामधून बारामतीचा चेहरामोहरा बदलणार आहे.