
पुणे | ६ जुलै २०२५. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने कुरीयर बॉयने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस तपासानंतर ही संपूर्ण तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून, खोट्या तक्रारीमुळे पोलिस यंत्रणेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
२ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास, तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत सांगितले होते की, एका कुरीयर बॉयने तिच्या घरात जबरदस्ती घुसून स्प्रे फवारून तिला बेशुद्ध करत अत्याचार केला. या तक्रारीनंतर पुणे शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ २० पथकांची नियुक्ती करत कसून तपास सुरू केला.
मात्र तपासात मोठा ट्विस्ट समोर आला. पोलिसांनी संशयित तरुण आणि तक्रार करणाऱ्या तरुणीची समोरासमोर चौकशी केली असता, संबंधित तरुण तिचा ओळखीचा असून, त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले. इतकंच नव्हे तर, तरुणीनेच स्वतः त्याला घरी बोलावल्याची माहिती समोर आली.
तक्रारीत उल्लेख केलेला कोणताही स्प्रे वापरण्यात आल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. याशिवाय, तिने सोशल मीडियावर अॅप वापरून फोटो एडिट करून “मी पुन्हा येईन” असा मजकूर टाकल्याचेही तपासात उघड झाले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “या संपूर्ण प्रकरणात तरुणीने खोटी तक्रार दाखल करत पोलिसांची फसवणूक केली असून, केवळ वैयक्तिक रागातून ही संपूर्ण कथा तिने बनवली.” या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेला अनावश्यक त्रास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संशयित तरुणाला नोटीस देऊन सोडण्यात आले असून, त्याला पुढील चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आता या खोट्या तक्रारीसंदर्भात संबंधित तरुणीवर काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





