फलटण | ५ जुलै २०२५ | साहस Times :फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटणच्या पाच महिला खेळाडूंनी हॉकी क्षेत्रात मोठे यश मिळवत सातारा जिल्ह्याचा गौरव उंचावला आहे.
हॉकी इंडिया अंतर्गत रांची (बिहार) येथे ७ ते १५ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर महिला हॉकी स्पर्धेपूर्वी आयोजित हॉकी महाराष्ट्रच्या प्रशिक्षण शिबिरात दि हॉकी सातारा संघटनेच्या खेळाडू कु. निकिता वेताळ, कु. श्रेया चव्हाण, कु. अनुष्का केंजळे, कु. तेजस्विनी कर्वे आणि कु. वेदिका वाघमोडे यांची निवड झाली होती.
या शिबिराच्या शेवटच्या दिवशी घोषित अंतिम महाराष्ट्र संघात कु. निकिता, कु. श्रेया, कु. अनुष्का आणि कु. वेदिका यांना स्थान मिळाले.
विशेषतः –
🔸 निकिता, श्रेया, अनुष्का यांनी सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले.
🔸 वेदिका वाघमोडे हीने प्रथमच सब-ज्युनिअर संघात स्थान मिळवत महाराष्ट्राच्या सर्वात लहान वयाच्या खेळाडूचा बहुमान पटकावला.
या खेळाडूंना हॉकी महाराष्ट्र संघाचे ज्येष्ठ प्रशिक्षक महेश खुटाळे सर आणि प्रशिक्षक सचिन धुमाळ सर प्रशिक्षण देत आहेत. सहाय्यक म्हणून बीबी खुरंगे सर कार्यरत आहेत.
या निवडीची संपूर्ण प्रक्रिया हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. श्री. कृष्ण प्रकाश (IPS), उपाध्यक्ष ओलंपियन मा. धनंजय महाडिक आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मा. मनोज भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनी सर्व निवड झालेल्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शन करताना कृष्ण प्रकाश सरांनी सांगितले, “फलटणसारख्या ठिकाणी अशा दर्जेदार खेळाडू निर्माण होत असतील, तर तेथे ‘एस्ट्रोटर्फ’ हॉकी मैदानाची नितांत गरज आहे.“
या घवघवीत यशाबद्दल पुढील मान्यवरांनी अभिनंदन केले:
- मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर – माजी विधान परिषद सभापती
- मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर – चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती
- मा. श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर – अध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन
- श्री शिवाजीराव घोरपडे – क्रीडा समिती चेअरमन, फलटण एज्यु. सोसायटी
- प्राचार्य वसंतराव शेडगे – मुधोजी हायस्कूल
- श्री बाहुबली शहा – अध्यक्ष, दि हॉकी सातारा
- श्री पंकज पवार, श्री प्रवीण गाडे, श्री विजय मोहिते, श्री महेंद्र जाधव, श्री सचिन लाळगे, व माजी राष्ट्रीय खेळाडू श्री सुजीत निंबाळकर
सातारा जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात हे यश एक नवीन अध्याय निर्माण करणारे ठरले आहे!