बारामती :राजकारण आणि सहकाराच्या क्रॉसरोडवर उभ्या असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली. तर व्हाईस चेअरमन म्हणून संगिता कोकरे यांची निवड करण्यात आली. मात्र, ही निवड तितकीशी सोपी नव्हती. विरोधी गटाचे एकमेव निवडून आलेले संचालक चंद्रराव तावरे यांनी याला जोरदार आक्षेप घेतला.
त्यांचा दावा होता की, “ब वर्गातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन बनवण्यास उच्च न्यायालयाने (औरंगाबाद खंडपीठ) बंदी घातली आहे” – आणि म्हणूनच अजित पवारांची निवड बेकायदेशीर आहे.
यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र “वेळ संपली आहे” असं सांगत अजित पवारांची निवड कायम ठेवली.
एकतर्फी विजय, पण अधुरा स्वप्न!
२२ जून रोजी पार पडलेल्या मतदानात अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला, तर विरोधकांच्या ‘सहकार बचाव पॅनल’चे चंद्रराव तावरे हे एकमेव संचालक निवडून आले. शरद पवार समर्थक ‘बळीराजा पॅनल’ ला एकही जागा मिळवता आली नाही.
विरोधकांचे रंजन तावरे म्हणाले, “अजित पवारांचा हा विजय जनशक्तीवर नव्हे, तर धनशक्तीवर आहे. आम्ही अजित पवारांना झुंजवलं. एक संचालक निवडून आणलाच. त्यामुळे पूर्ण बहुमताचं स्वप्न अजून अधुरंच राहिलं.“
विरोधकांची कायदेशीर लढाई सुरूच राहणार?
चंद्रराव तावरे यांनी बैठकीतून वॉकआऊट केल्यानंतर अजित पवारांची चेअरमनपदाची निवड एकतर्फी झाली. पण, यावर कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा रंजन तावरे यांनी दिला आहे. “ही नियुक्ती बेकायदेशीर असून आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठवू,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.