- Marathi News
- Opinion
- Krishnamurti’s Thought Process Benefited From Kabir’s Level Of Consciousness Divya Marathi Rasik Article By Hemkiran Patki
हेमकिरण पत्की1 तासापूर्वी
- कॉपी लिंक
जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक काळातील एक थोर विचारवंत होत. त्यांनी जगातील अनेक धर्मांत प्रचलित असलेल्या परंपरा, रूढी, रीती, साधनापद्धती आणि कर्मकांडे, ग्रंथप्रामाण्य आदींना शुद्ध तर्कानं प्रश्नांकित केलं. आपल्या संवादांतून समोरच्या श्रोत्यांना सस्नेह विचारलं: ‘या परंपरांचे पाईक होऊन आणि ग्रंथांना प्रमाण मानून तुम्हाला प्रेम नावाची आंतरिक स्थिती आजवर उमजलीय का? माणसामाणसांतला बंधुभाव तुमच्या रोजच्या जगण्यात उतरलाय का? मग आमूलाग्र परिवर्तन कसं होणार? तुम्ही आत्मनिर्भर कधी होणार?’ कृष्णमूर्तींनी आध्यात्मिक प्रवासाला निघालेल्या प्रेमशील माणसासाठी एक शाश्वत चिंतन ठेवलं : ‘सत्याकडे जाणारा एखादा विशिष्ट मार्ग नसतो किंवा सत्याकडे जाणारी चाकोरी नसते.’
स्थल – कालाचं मोठं अंतर असतानाही कबीर आणि कृष्णमूर्ती या दोन सत्पुरुषांमध्ये आपल्याला काही साम्य दुवे जाणवतात. ज्या काळात कबीर आपल्या श्रोत्यांना पदं आणि दोहे ऐकवत होते, तो काळ मूल्यांमध्ये संथपणे बदल घडण्याचा काळ होता. परंपरांनी संस्कारबद्ध असलेली आणि त्यांना ऐकणारी माणसं हळूहळू बदलत होती. पण, कृष्णमूर्ती आधुनिक काळातले होते. त्यांनी देशादेशांतील युद्ध, नरसंहार, बेचिराख झालेली शहरं आणि निर्वासित माणसं असं सारं पाहिलं. माणसांच्या संवेदना आणि वेदनांचा पट अनुभवला. पुढे औद्योगिकरण, यांत्रिकीकरण आणि जागतिकीकरणाचा माणसांच्या जीवनशैलीवर, विचारसरणीवर झालेला इष्टानिष्ट परिणामही पाहिला.
कबीरांनी अभावग्रस्त माणसाच्या भोगासक्त मनाचं जे चित्र आतून जाणलं होतं, तेच कृष्णमूर्तींनी आधुनिक काळातील माणसांच्या मूल्यांच्या पडझडीत आपल्या अंत:पटलावर उमटलेलं पाहिलं. कबीर परिस्थितीनं अगदी साधे होते. या दोघांमध्ये अध्यात्मातील अद्भुत साम्य दिसतं. दोघेही अद्वैत दर्शन जगणारे सत्पुरुष होते. अहंकार हाच माणसाला समग्र जगापासून तोडणारा आणि चेतनेचं विघटन करणारा घटक आहे हे दोघांनी जाणून संस्कारबद्ध माणसाला मुक्त करण्याचा एकमेव प्रेममय जीवनमार्ग अवलंबला होता. माणसामाणसातील नात्यांच्या भावार्थानं कबीर आणि कृष्णमूर्ती यांची हृदयं करुणामय झालेली होती. लोकजीवनात उतरलेल्या एका दोह्यात कबीर म्हणतात…
जा घट प्रेम न संचरे,
सो घट जान मसान।
जैसे खाल लोहार को,
सांस लेत बिन प्रान।।
लोहाराचा भाता हवा आत घेतो आणि सोडतो. पण, त्यात प्राण कुठं असतो? तद्वत यांत्रिकपणे श्वास घेणारा, निःश्वास सोडणारा माणूस कुठं जिवंत असतो? नुसता श्वास घेणं – सोडणं हे माणसाच्या जिवंतपणाचं व्यवच्छेदक लक्षण होऊ शकत नाही. प्रेमभावाशिवाय असलेलं परस्परांमधलं नातं असंच त्या लोहाराच्या भात्यासारखं आहे. आपल्या विलक्षण बुद्धीच्या सहाय्यानं विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती केलेला माणूस कृष्णमूर्तींना जीवनगंधास पारखा झाल्यासारखा वाटत होता. ते म्हणतात… ‘प्रेम हे मनाने कल्पिलेले साध्य नसते. म्हणून प्रेम प्राप्त करून घेण्याचे साधनही मिळणे शक्य नसते ही वस्तुस्थिती आहे. पण, आपण नेमके हेच कधी समजून घेत नाही आणि हीच आपली मुख्य अडचण आहे. या वस्तुस्थितीचे संपूर्ण आणि सखोल आकलन होते तेव्हाच या संसारी जगाच्या पार असलेले असे जे असते त्याचा स्पर्श होणे संभव होते. त्या निगूढ अज्ञाताचा स्पर्श झाल्याशिवाय आपण काहीही केले तरी मानवी नात्यात चिरंतन स्वरूपाचे सौख्य नांदणे शक्य नसते.’ हे चिरंतन स्वरूपाचं सौख्य म्हणजे कबीर म्हणतात ते प्रेम आहे. या थोर द्वयींतील आणखी एक साम्यस्थळ पाहू. कबीरांचा एक दोहा आहे…
हद हद पर सब ही गया,
बेहद गया न कोय।
बेहद के मैदान में,
रमै कबीरा सोय।।
आपल्या ठायी असलेल्या खास गुणवैशिष्ट्यांमुळे आपण दुसऱ्या माणसाची प्रत ठरवतो. आपल्या आकलनाची कुंपणं तयार करतो. त्यामुळं आपल्याला मनाचे काठ मोडून उत्कटपणे वाहता येत नाही. कबीरांच्या दृष्टीनं प्रेम हे नदीच्या प्रवाहासारखं आहे. ते मनाच्या कुंपणांतून वाहत नाही. प्रेम करणाऱ्याला मनाचे काठ मोडून वाहावं लागतं. मी अशा मुक्त प्रवाहातला आहे, असं ते सांगतात. हाच भाव व्यक्त करताना कृष्णमूर्ती म्हणतात… ‘भेटायला आलेली सारी माणसे व्यावसायिक वृत्तीची होती. एक जण सांगत होता की तो शास्त्रज्ञ आहे, दुसरा गणितज्ज्ञ आणि तिसरा अभियंता आहे. सारेच तज्ज्ञ होते. त्यांपैकी एकही जण आपल्या मनाची कुंपणं ओलांडून पुरातल्या नदीसारखा वाहणारा नव्हता. नदीचं काठ मोडून वाहणंच तर मातीला सुपीक बनवतं.’
प्रेमातील भावोत्कटतेविषयीचं कबीर आणि कृष्णमूर्ती यांचं हे चिंतन एकाच अस्तित्व केंद्रातून प्रकट झाल्याचं जाणवतं. आयुष्य उत्कटतेनं जाणून घेणाऱ्यांसाठी ते आत्मीय आहे. कबीर आणि कृष्णमूर्ती यांचे विचारप्रवाह हे परंपरा, लोकमान्यता, ग्रंथप्रामाण्य, प्रस्थापित जीवनरीत नाकारणारे असल्यानं वेगवेगळ्या काळात ते समांतरपणे वाहताना दिसतात. त्यातूनच या दोन्ही सत्पुरुषांचा चेतनेचा स्तर एकच असल्याचं आपल्याला जाणवतं.
(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)







