९५ वर्षांच्या आजोबांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव; मतदानाचा हक्क बजावला

0
19
९५ वर्षांच्या आजोबांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव; मतदानाचा हक्क बजावला


फलटण (सासकल): लोकशाहीला सन्मान देत आणि नव्या पिढीला प्रेरणा देत मौजे सासकल येथील ९५ वर्षांचे रामचंद्र गार्डे यांनी व्हीलचेअरवर येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील व्यक्तींना दिलेल्या घरगुती मतदानाच्या सुविधेचा नकार करत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन हजेरी लावली.

रामचंद्र गार्डे यांनी सांगितले, “मतदान हा आपला संविधानाने दिलेला हक्क आहे. लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. हा लोकशाहीचा उत्सव असल्याने मी मतदान केंद्रावर येऊन स्वतः हा हक्क बजावण्याचा निर्णय घेतला.”

त्यांनी नेत्यांच्या काही चुकीच्या प्रवृत्तीवरही रोष व्यक्त केला. “लोकशाहीच्या प्रक्रियेत पैशांचे आमिष, दारू-मटन यासारख्या प्रलोभनांना थारा देता कामा नये. अशा प्रवृत्तींना रोखणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

सासकल येथील या ९५ वर्षांच्या मतदाराने लोकशाहीसाठी दाखवलेली ही समर्पण भावना तरुणाईसाठी आदर्श ठरली आहे.