
फलटण प्रतिनिधी – माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे अॅड. धीरज घाडगे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर २७७ गुन्ह्यांचे आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज फलटण येथे अॅड. धीरज घाडगे, अॅड. नरसिंह निकम व अॅड. सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.
अॅड. घाडगे यांनी सांगितले की, उपविभागीय पोलीस अधीक्षक, फलटण यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे अंधारे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत.
अॅड. घाडगे यांनी पुढे सांगितले की, सुषमा अंधारे यांनी केलेल्या खोट्या वक्तव्यांबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वतीने ५० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून ४८ तासांच्या आत जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “ही पत्रकार परिषद पीडित डॉक्टर युवतीला न्याय मिळवण्यासाठी घेतली की दिगंबर आगवणे यांच्या बचावासाठी?” तसेच त्यांनी सुचवले की सुषमा अंधारे यांनी ज्यांच्या शेजारी बसून आरोप केले, त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत हेही त्यांनी आधी तपासून पाहावे.
अॅड. घाडगे यांनी पुढे म्हटले की, त्या डॉक्टरच्या प्रकरणाशी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा काहीही संबंध नाही. आजवर एकाही ऊस मुकादमाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच नंदकुमार ननावरे यांच्या बाबतीत करण्यात आलेले वक्तव्यही चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. घाडगे यांनी आणखी स्पष्ट केले की, ‘रणजित निंबाळकर’ या नावाने फलटण तालुक्यात तब्बल २१ लोक आहेत, त्यामुळे गैरसमज झाला असावा. मात्र, खरे तथ्य म्हणजे माजी खासदार नाईक-निंबाळकर यांच्यावर कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल नाही.
शेवटी अॅड. घाडगे यांनी म्हटले की, “ज्या दिगंबर आगवणे यांच्या समर्थनार्थ सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांच्यावरच अनेक बँक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे खरे-खोटे जनतेसमोर स्पष्ट होईल.”








