
निलेश खरमरे झी 24 तास पुणे : हिवाळा सुरु झाला आहे. हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. अशाही वातावरणात काहीजण थंड पाण्यानं आंघोळ करतात. थंड पाण्यात आंघोळ करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे की तोट्याचं असा प्रश्न निर्माण झालाय. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ करणं तुम्हाला गंभीर आजारांच्या दारात नेत असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय माणूस रोजच्या दिवसाची सुरुवात आंघोळीनं करतो. भारतीय संस्कृतीत आंघोळीला अतिशय महत्व आहे. आंघोळीनंतरच दिनचर्येला सुरुवात करायची असा अलिखित दंडकच आहे. अगदी पहाटे पाचला उठून लोकं हाड गोठवणा-या थंडीतही आंघोळ करतातच… फक्त ऋतूनुसार काही लोकं थंड पाणी, गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करतात. काही भारतीय तर तीनही ऋतू थंड पाण्यानं आंघोळ करतात. अगदी थंडीच्या दिवसातही ही लोकं थंड पाण्यानं आंघोळ करतात. ही झाली सवयीची गोष्ट पण साधारणपणे सर्वसामान्य माणूस पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम पाण्यानं आंघोळ करतात. उन्हाळ्यात गरम पाण्याऐवजी साध्या पाण्यानं आंघोळ करण्यास प्राधान्य देतात. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ करण्याचे आपले फायदे तोटे आहेत. थंड पाण्यानं आंघोळ करणं सोप्पं आणि आरोग्यदायी असेल असं वाटत असलं तरी सगळ्यांसाठीच ते फायदेशीर नाही. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळीची तर कल्पनाच करवत नाही. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ कुणी करु नये याचे काही नियम असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
थंड पाण्यानं आंघोळ केल्यास काय होतं?
सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा, हायपोथर्मिया हे आजार होतात. तसेच हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ केल्यानं ह्रदयावर दबाव येतो. थंड पाण्यात आंघोळ केल्यास ह्रदयगती वाढते. थंड पाण्यामुळं श्वास घेण्यास त्रास होतो. ह्रदयरोगाचा त्रास असलेल्यांनी हिवाळ्यात थंड पाण्यात आंघोळ करू नये असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
थंड पाण्यानं आंघोळ करणं हे सुदृढ आरोग्याचं लक्षण मानलं गेल आहे. जो माणूस थंड पाण्यानं आंघोळ करतो तो आरोग्यदायी जीवन जगतो असं मानलं जातं. पण सरसकट सगळ्यांनाच हिवाळ्यात थंड पाणी मानवत नाही. रेसलिंग किंवा कुस्तीपटू नेहमीच बाराही महिने थंड पाण्यात आंघोळ करतात. थंड पाण्यात आंघोळीचेही काही फायदे आहेत.
थंड पाण्याने आंघोळ केल्यानं रक्ताभिसरण सुधारते. थंड पाण्यात आंघोळीनं तणावमुक्तीची अनुभूती त्वचा आणि केसाचे आरोग्य सुधारतं. थंड पाण्यानं आंघोळीचे काही फायदे असले तरी या फायद्यांसाठी दुसरा करतो म्हणून त्याचं अनुकरण करू नका… स्वतःला झेपत नसेल तर हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ टाळाल. तसं केलं नाहीतर तुम्हाला उगाचच दवाखान्याचे हेलपाटे मारावे लागतील.







