हिमाचलमध्ये ढगफुटी! पुराच्या पाण्यात रस्ते, घरं वाहून गेली; सर्वत्र हाहाकाराचे व्हिडीओ काळजात धस्स करणारे

0
2
हिमाचलमध्ये ढगफुटी! पुराच्या पाण्यात रस्ते, घरं वाहून गेली; सर्वत्र हाहाकाराचे व्हिडीओ काळजात धस्स करणारे


Himachal Pradehs Cloudburst : (Monsoon) मान्सूननं सध्या संपूर्ण देश व्यापला असला तरीही याच मान्सूननं (Himachal Pradesh Weather Update) हिमाचल प्रदेशात मात्र हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये पावसामुळं नद्यांनी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं. तर, आता याच राज्यातील मंडी इथं ढगफुटीमुळं नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे. 

(Himachal Pradesh Mandi Cloudburst) मंडी येथील करसोग इथं झालेल्या ढगफुटीनंतर या भागात प्रचंड पावसानं सर्वत्र हाहाकार माजवला. नजर जाईल तिथं फक्त आणि फक्त विध्वंसच दिसेल असं चित्र तिथं पाहायला मिळालं. कससोगमधील पंजराच आणि मेगली या गावांचं या ढगफुटीमध्ये सर्वाधिक नुकसान झालं असून, तेथील अनेक घरं नजरेदेखत अतिप्रचंड वेगानं आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली, तर काही वाहनं आणि रस्तेसुद्धा या पाण्यात वाहून गेल्याचं पाहायला मिळालं. 

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…

हिमाचलमधील मंडी इथं ज्या भागात ढगफुटी झाली तिथं सध्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत असून, या नागरिकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनानं प्रभावित क्षेत्रामध्ये शक्य त्या सर्व मार्गांनी मदतकार्य पोहोचवण्यास सुरूवात केली असून, जोखमीच्या भागांमध्ये बचावकार्यसुद्धा सुरू केलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात पावसानं सर्वत्र हाहाकार माजवला असून त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. काही गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला असून, काही भागांचा विजपुरवठासुद्धा खंडित झाला आहे. हवामान विभागानं पुढील 24 तासांमध्ये हिमाचलमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवल्यानं येथील प्रशासन सध्या सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वीचत हिमाचलच्याच कुल्लू आणि कांगडा इथंही ढगफुटी झाल्यानं अचानक नद्यांची पाणीपातळी वाढली आणि वाटेल येणारी प्रत्येक गोष्ट हे नदीपात्र गिळंकृत करताना दिसलं. ज्यानंतर या भागांमधून 10 जण बेपत्ता असल्याचं वृत्त समोर आलं. सध्याच्या घडीला प्रशासनसुद्धा हिमाचलमधील हवामान आणि पर्जन्यमानावर लक्ष ठेवत असून, या राज्यातील पर्यटकांनासुद्धा सुरक्षित स्थळी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 





Source link