साताऱ्यात ‘त्या’ सभापती महिलेस 10 कोटी दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही

0
1


पुणे : सातारा (Satara) जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर महायुतीमधील दोन प्रमुख पक्षात चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेते तथा मंत्री शंभुराज देसाईंनी विधिमंडळात या राड्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. तसेच, याप्रकरणी चौकशीचे आदेशही विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते. आता, सातारा जिल्हा परिषद सभापती निवडींवरुनही पुन्हा गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी गंभीर आरोप केला आहे. एका सभापतीला 10 कोटी रुपये देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठले असून भाजपने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला. बहिष्कार, घोषणाबाजी आणि थेट आंदोलनामुळे राजकारण तापलं असून आता हा संघर्ष उघडपणे ‘तू-तू, मी-मी’ पर्यंत पोहोचला आहे. साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष पेटला आहे. या वादानंतर जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील एका बाजूला तर विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे. 

कर्णे म्हणून सभापती झाल्या आहेत, 10 कोटी रुपये त्यांना देण्यात आले आहेत. लोकांना आपण अपात्र होऊ किंवा आपल्यावर पक्ष कारवाई करेल, अशी काही भीती राहिली नाही, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले. आता वाईचे विराज शिंदे यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत. त्यांच्याच घरातील सुरेश जाधव जे काँग्रेसमधील मोठे नेते होते. अशा घराचा वैचारिक वारसा देखील यांनी जपला नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी एक याचिका आम्ही दाखल केली आहे. लवकरच त्यांना अपात्र करण्यासाठी शंभूराजे देसाई देखील याचिका दाखल करतील, अशी माहिती देखील शशिकांत शिंदे यांनी दिली.

लता कर्णे विषय समिती सभापती

सातारा जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी भाजपकडून प्रत्येक सभापतीपदासाठी एकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घोषित केले. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा विराज शिंदे यांची निवड झाली. तर, समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची धुरा ऋषीकेश धायगुडे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. विषय समिती सभापती म्हणून लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राष्ट्रवादीचे आमदार भेटत आहेत का?

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटत आहेत, ह्याबाबत माझ्याकडे काही माहिती नाही. आमदार विधिमंडळात भेटत होते, त्यावेळी अजित पवार यांच्या निधनानंतर काय? याबाबत बोलत होते, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले. 

सीडीआर प्रकरणी तपास व्हायला हवा

अशोक खरात प्रकरणामधील व्हिडिओ क्लिप, सीडीआर बाहेर कसे काय आले? अंजली दमानिया यांच्याकडे जाणीवपूर्वक सीडीआर पाठवले असतील? जाणीवपूर्वक कुणाला टार्गेट केलं जात आहे का? याचा देखील तपास व्हायला हवा, अशी मागणी सीडीआरप्रकरणी शशिकांत शिंदे यांनी केली.

राहुरीत पोटनिवडणूक लढवणार

बारामती पोटनिवडणुकीबाबत आम्ही भूमिका जाहीर केली आहे. आमचा पक्ष तिथं निवडणूक लढणार नाही. महाविकास आघाडी म्हणून राहुरीमध्ये सामोरे जाणार आहोत. अजित पवार यांच निधन झालं, त्यावेळीच आम्ही निर्णय जाहीर केला की आम्ही निवडणुका लढणार नाही. प्राजक्त तनपुरेसोबत आम्ही बोलणार आहोत, जयंत पाटील आणि मी बोलेल आणि निर्णय जाहीर करू, असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा

आणखी वाचा



Source link