साताऱ्यातील घाटमाथ्यांवर पावसाचा रेड अलर्ट, प्रमुख धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

0
2


Maharashtra Weather Update : सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये असलेल्या घाट माथ्यावर गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस (Weather Update) सुरू झाला असून या भागातील धरण परिसरामध्ये मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून 12 हजार 100 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे, धोम-बालकवडी धरणातून 2,330 क्यूसेक, धोम धरणातून 2, 268 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. कनेर धरणातून 740 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिणामी नदीनाल्यांच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाण्याचे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. असा इशारा देखील यावेळी नागरिकांना देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी, 32 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली

अशातच, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट पाच इंच इतकी आहे. तर आणखी एक फूट पाणी पातळी वाढल्यास पंचगंगा पुन्हा एकदा पत्राच्या बाहेर पडू शकते. दरम्यान, घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. त्यामुळेच राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यामुळे भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने सुमारे 32 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत सर्वाधिक पावसाची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. मात्र आता कणकवलीमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडनदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी कणकवली-मालवण राज्य मार्गांवर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही वाहन चालक त्याच पाण्यातून वाट काढत जातं आहेत. जिल्ह्यात आज देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत 86 मी.मी. सरासरी जिल्ह्यात पाऊस कोसळला असून सर्वाधिक पाऊस 172 मी.मी पाऊस कणकवलीत कोसळला आहे.

कुंभी आणि वारणा धरणातून विसर्ग वाढणार

दुसरीकडे, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये  होत असलेल्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ  होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आजपासून सकाळी 10 वाजता वक्र द्वाराद्वारे 5000 क्युसेक विसर्ग  सुरू करण्यात येत आहे व विद्युतगृहातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून तो 1630 क्युसेक असून एकूण  6630 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. परिस्थितीनुसार विसर्ग सुरू करण्यात येईल.

दरम्यान, कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कुंभी धरणातूनही आज वक्रद्वाराद्वारे 1000  क्युसेक व विद्युतगृहातून चालू असणारा 300 क्युसेक असा एकूण 1300 क्युसेक विसर्ग कुंभी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा



Source link