सातारा : जिल्ह्यात खासदार, आमदारांची संख्या वाढल्याने भाजपच्या (BJP) नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. मंत्री शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने साताऱ्यात संख्याबळ नसतानाही भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षपद ताब्यात घेतलं. मात्र, या निवडणुकीवेळी झालेल्या राड्यावरुन शिवसेना आणि भाजपात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्यातील या निवडीचा वाद आज अधिवेशन काळात सभागृहात दिसून आला. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण, भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे ह्यांनी खोट ओबीसी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय.
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदावर ज्या व्यक्ती बसल्या आहेत त्या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. मात्र, त्या ओबीसी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदावर बसल्या आहेत. ज्या दिवशी अध्यक्षपदाची निवड होती त्या दिवशी सकाळी 11 वाजता त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहे. याचाच अर्थ खोट्या दाखल्याचा वापर करून त्यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, याची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी शशिकांत देसाई यांनी सभागृहात केली.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ‘स्वबळा’चा नारा देत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीशी तडजोड करुन निवडणुकीत 65 पैकी सत्तेसाठी बहुमतासाठी आवश्यक 35 जागा मिळविल्या. परंतु, भाजप विरुद्ध सर्व असे चित्र जिल्हा परिषद निवडणुकीत निर्माण झाल्याने भाजपला केवळ 27 जागांवर समाधान मानावे लागले. तरीही भाजपने ऑपरेशन लोटसचा प्रयोग करत विरोधकांचे पाच सदस्य फोडून 30 विरूध्द 33 मतांनी जिल्हा परिषदेत सत्ता आणली. त्यावरुन, आता भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला आहे. तर, राष्ट्रवादीनेही साताऱ्यातील घटनेवरुन भाजपविरुद्ध नाराजी व्यक्त केलीय.
खटाव तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष
जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे यांनी निवड झाली आहे. डॉ. शिंदे या खटाव तालुक्यातील असून त्या सर्वसाधारण जागेवर निवडून आल्या आहेत. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीदिवशी त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यामुळे, त्या ओबीसी प्रवर्गातून अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेवर मागील चार वर्षे प्रशासक राजवट होती. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी निवडणूक झाली. त्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली.
हेही वाचा
आणखी वाचा







