
- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Article Write By Datta Patil Sadar Name Is Sanbhrmache Mihak
दत्ता पाटील2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गावातले ढोलताशे थांबल्यानं आता आज्ज्याचा खोकला नीट ऐकू येऊ लागलाय. लांब दाट कडूलिंबाच्या झाडांशी कावळ्यांच्या झुंडी कोणाला तरी जातीबाहेर हुसकावण्यासाठी कालवा करू लागल्याहेत.. वरून थवा चुकलेला नि मागे राहिलेला करकोचा जिवाच्या आकांतानं ओरडत मावळतीकडं उडत चाललाय.. रातकिड्यांना रात्रही कमी पडत असल्यानं दिवसाही त्यांनी त्यांच्या करवती आवाजांना मोकळं सोडून दिलंय.. एक अंधार वगळला, तर रात्र नि दिवस ह्यात काही फरकच ऱ्हायला नाहीय…
पाऊस काही नीट आला नाही. पाऊस केव्हाही येऊन सतत कोसळत राहिल, असा काळोख रोज दाटून येतोय; पण पाऊस येत नाही. घरात नव्वदीचा आज्जा दिवसा-रात्री खोकत राहतो. दिवसा आसमंतात खूप आवाज घुमत राहतात. बैलांचे, गायींचे, मेंढरांच्या कळपांचे, मोबाइलांच्या रिंगटोनांचे, रिळांचे, साळुंक्या, कावळे, आकाशातून जाणाऱ्या विमानांचे आवाज मिक्स होत राहतात. त्यामुळे दिवसा आज्ज्याच्या खोकल्याचा आवाज बाहेर येत नाही. त्यामुळं ‘काय म्हंतोय म्हातारा?’ या बांधापलिकडच्या प्रश्नांना, ‘दिवसा चांगला राहतो, रातच्याला जीव जाईल यवढा खोकलतो..’ असं उत्तर असतं. पाऊसही आज्ज्यासारखाच. सतत असतो आणि त्याचवेळी नसतोही.
मघाशी जेवताना मोबाइलवर ‘अचानक ढगफुटीने जोरदार पाऊस’ ही बातमी पाहिली. नद्या-नाले एकाच पावसानं फुल्ल भरल्यामुळं लोक खूश होते. शेतातली पिकं पुरासोबत निघून गेल्याचा आक्रोश करणाऱ्याकडं कॅमेरामन सेकंदभर थांबला नि आनंद व्यक्त करणाऱ्या टोळ्यांकडं निघून गेला. एकाच दिवसात सगळं काही तुडुंब भरणारा पाऊस आवडू लागलाय लोकांना. चार महिने थांबून राहायची गरजच नाही. इलेक्शन आलं की, आठवडाभरात रस्ते नीट होतात, पाणी रेग्युलर यायला लागतं, गॅसचे भाव कमी होतात.. इलेक्शनच्या काळापुरतीच लोकशाही हवी. त्यानंतर राबवायला ती परवडत नाही. मध्येच लोकशाहीचं कोणी बोलायला लागलं की ते बेमोसमी वाटायला लागतं.
गावातले नोकरीतून निवृत्त झालेले शहाणे, सुखी, समृद्ध लोक हसतात यावर. आता आहे तीच खरी लोकशाही आहे, असं त्यांचं ठाम मत आहे. आधीच्या सरकारातला सगळा काळ नोकरीरूपी छळछावणीत, पारतंत्र्यात गेला. दरवेळी लागू होत गेलेला वेतन आयोग, मिळणारा फरक, मुलांचे शिक्षण, करिअर, नोकरी, आई-वडिलांच्या अपेक्षा इत्यादी गोष्टीत व्यस्त असल्यानं देशातील तत्कालीन लोकशाहीकडं त्यांना लक्षच देता आलं नव्हतं. निवृत्त होता होता किंवा निवृत्तीनंतर योगायोगानं सरकारही बदलल्यानं आणि तेही सतत लोकशाही, लोकशाही असं बोलत असल्यानं गावातले अनेक निवृत्त लोकांना या लोकशाहीच्या संगोपनार्थ देवळांमध्ये, सभामंडपात, सोशल मीडियावर जबरदस्त क्रांतिकारी चळवळ उभी करता येऊ लागली आहे. त्याकाळी मिळत असलेला पगार हा हक्क होता आणि निवृत्तीनंतर आता मिळणारी पेन्शन हा ईश्वरी प्रसाद आहे, असा डायलॉग गेल्या सत्तर वर्षातील चाळीस वर्ष नोकरीरूपी पारतंत्र्यात घालवून आता ‘राष्ट्रउभारणी हीच उद्याची गरज’ या मिशनमध्ये झोकून दिलेल्या काकांनी कालच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या मीटिंगमध्ये हाणला. गावातल्या मंदिराच्या सभोवताली असलेल्या जागेत जॉगिंग ट्रॅक तयार व्हावा, असा प्रस्ताव कालच्या मीटिंगमध्ये झालाय. थोडक्यात, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना सरकार बदललं आणि बदललेल्या लोकशाहीचा आनंद निवृत्तीमुळे तमाम निवृत्त काकांना छान घेता येऊ लागलाय.
गावाचं गावपण संपवून शहरी मध्यमवर्गीय विचारसरणीचे अतोनात संस्कार घराघरात जाऊन केले जाऊ लागल्यानं आमच्या वावरांमधल्या बऱ्याच दोस्त लोकांच्या पडवीत संत तुकोबांच्या, संत नामदेवांच्या, गांधी-नेहरूबाबाच्या फोटोशेजारी दाढीवाले चार-दोन बाबा-बुवा ऐटीत जाऊन बसले आहेत. जरा वेळापूर्वी गावातून ढोल-ताशे ऐकू येत होते. धाकट्या भावाला विचारलं, तर म्हणला, ‘गॅसचे भाव कमी केल्यानं मिरवणूक काढण्यात आलीय..’ मी म्हणलो, ‘मग काल पण वाजत होते फटाके, डीजे.. ते का?’ तर बोलला, ‘गणपतीत रात्री बारापर्यंत ढोल-ताशा, डीजे वाजवायची परवानगी मिळाल्याच्या आनंदात पोरं नाचत होती.’ परवा ग्रामदैवताला सत्यनारायण घातला गावातल्या नेत्यानं. येणाऱ्या जाणाऱ्याला महाप्रसाद ठेवला. देश चंद्रावर पोचल्याच्या आनंदात. पंधरा दिवसापूर्वी सप्ताह बसला होता गावात. मोठ्या मंडपात. दर महिन्याला काहीतरी चालू असतं. गाव असं सतत बिझी राहतं. सप्ताह चालू असताना दोनदा भूरभूर पाऊस आला. कीर्तनकार बुवा म्हणले, ‘आपण न मागता प्रेम करत राहावं ईश्वरावर. बघा, कसा धुवांधार पाऊस सुरू झालाय. हा ईश्वरीय प्रसाद!’ हळूहळू सगळी गावं सारखीच दिसायला लागलीयत. माणसं पण. ती या गावची की त्या गावची, कळत नाही आता. गावातली दुकानं, हॉटेली, बाहेरच्या झिरमिळ्या, लायटिंग, वेफर्स, चिवड्या-शेंगदाण्याच्या पाकिटांच्या माळा.. सगळीकडं सारखंच.
पाऊस नाही. खोकणाऱ्या आजोबाला काहीच माहीत नाही. खूप पावसाळे पाहिले असतील त्यानं नि खूप उन्हाळेही. तो केव्हाही हे जग सोडेल. त्याचा फोटोही नसेल घरात. गेल्यावर खुर्चीत ठेवायला लागेल. पण, रोज रात्रीचं त्याचं खोकणं रानात घुमत जातं, तेव्हा तो जगातून कधीतरी नाहीसा होईल, यावरचा विश्वास उडून जातो. त्यामुळं फोटोही शोधणं राहून जातं. रान हिरवं दिसतंय. पण ते शेतकऱ्याला जगण्यासाठी पुरेसं नाही. शेत नसलेल्या जागेवरची खुरटी हिरवळ हा गावाकडचा निसर्ग अन् समृद्धी वाटून खूप लोकांचा आमच्या तक्रारींवर विश्वास बसत नाही. आम्ही दुष्काळाची, आलेल्या पिकाला भाव नसल्याची तक्रार करताच सोशल मीडियावर गावातले शहरी, सुशिक्षित लोक आमच्यावर तुटून पडतात. ‘सतत सरकारबद्दल तक्रार करणाऱ्यांना शेजारच्या देशात कायमचं पाठवायला पाहिजे,’ हे वाक्य रोज एकदा तरी ग्रुपवर कोणीतरी टाकत असतं.
कंटाळा येतो काम करत राहण्याचा. लहान भाऊ सतत मोबाइलवर बोलताना शेतात काम करत राहतो. बोलणं नसतं तेव्हा गाणी लावतो यूट्यूबवर. जेवताना रिळं पाहात हसत राहतो. मध्येच सहा सहा महिने गावात नव्यानं झालेल्या मॉलसदृश किराणा मालाच्या दुकानात कामाला जातो. महिना पाच हजार कमावतो. त्यानं हप्त्यानं मोबाइल घेतला मागंच. आजोबा आहे तोवर लग्न करावं त्याचं, असा विचार गेली तीन वर्ष सुरू आहे घरात, नातलगात. आजोबा जात नाही आणि ह्याचं लग्नही होत नाही. तोही प्रयत्न करत नाही. दिवसा कामात नाहीतर गावात. त्याचा भोवताली वावर असा नीट नसल्यानं त्याचं असणं-नसणं सारखंच. कधी लागले तर पैसे मागंल. ते लगेच मिळत असल्यानं पुढे संवादही नीट होत नाही. त्याची सगळी मित्रमंडळीही अशीच. कोणाचाही वाढदिवस असो, पार्टी आमच्या मळ्यातच. बोकड किंवा कोंबडीची सोय करून द्यावी लागते. गावात हल्ली बऱ्याच घरांमध्ये मटण खाल्लं जात नाही. त्यामुळं घरातील नवी पोरं ढाब्यावर किंवा इकडं आमच्या मळ्यात येतात. बाटल्या घेऊन. आताही तो निळी जीनची पँट नि पिवळा टोपीवाला टी शर्ट घालून गावात मटण आणायला पैसे घेऊन गेलाय.
मघाशी ऊन होतं. आता कोपऱ्याला ढग आलेत गोळा होऊन. आलाच तर गावशिवाराचा एखादा कोपरा ओला होईल. कुणीतरी व्हिडिओ काढून ‘अमुक गावात धुवांधार पाऊस.’ असं व्हाटस् अॅपवर टाकंल संध्याकाळी. तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, देशाला, जगाला वाटंल की गावाची ददात मिटली! गावातले ढोलताशे थांबल्यानं आज्ज्याचा खोकला नीट ऐकू येऊ लागलाय. लांब दाट कडूलिंबाच्या झाडांशी कावळ्यांच्या झुंडी कोणाला तरी जातीबाहेर हुसकावण्यासाठी कालवा करू लागल्याहेत… वरून थवा चुकलेला नि मागे राहिलेला करकोचा जिवाच्या आकांतानं ओरडत मावळतीकडं उडत चाललाय… रातकिड्यांना रात्रही कमी पडत असल्यानं दिवसाही त्यांनी त्यांच्या करवती आवाजांना मोकळं सोडून दिलंय… एक अंधार वगळला, तर रात्र नि दिवस ह्यात काही फरकच ऱ्हायला नाहीय…
दत्ता पाटील
dattapatilnsk@gmail.com
संपर्क : ९४२२७६२७७७






