
गौरी मांजरेकर
भारतीय संस्कृतीत आणि तत्वज्ञानात भगवान श्रीकृष्णाचे स्थान अजोड आहे . श्रीकृष्णाचा उल्लेख केवळ एक अवतारी पुरुष किंवा दैवी चमत्कार करणारा देव म्हणून केला जात नाही ,तर एक कुशल राजनीती-तज्ञ ,दूरदृष्टीचा रणनीतीकार आणि सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक म्हणूनही हे व्यक्तिमत्व ओळखले जाते. महाभारत आणि विशेषतः श्रीभगवतगीतेतील श्रीकृष्णाचे विचार आजच्या कोर्पोरेट जगात आणि करियर बांधणीच्या वाटेवर मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ ठरतात. व्यवस्थापनाची मूळ तत्वे जसे की नेतृत्व, संवाद, ध्येय निश्चिती, टीम वर्क, आणि संकट काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता, ही सर्व कृष्णचरित्रात व गीतेतील विचारांतून आढळतात. श्रीकृष्णाची व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शिकवण यातील तत्वे करियरच्या उभारणीसाठी वापरली जाऊ शकतात.
श्रीकृष्ण- दूरदृष्टी असलेला नेता (विजनरी लीडर)
श्रीकृष्णाचे आयुष्य हे दूरदृष्टी आणि योजनाबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे.
उदाहरण : कंसाचा वध केल्यानंतर मथुरेवर जरासंधाचे हल्ले होतील हे ओळखून श्रीकृष्णाने राजधानी द्वारकेला हलवली. एका सुरक्षित किनारपट्टीवरील मोक्याचे, नैसर्गिक ठिकाण त्यांनी राजधानीच्या शहरासाठी, त्यांच्या जनतेच्या पुनर्वसन करण्यासाठी निवडले. त्यामुळे जरासंधाच्या १७ हल्ल्यानंतरही द्वारका सुरक्षित राहिली.
करियर टूल: मार्केट ट्रेंड व तंत्रज्ञान यांच्या बदलाचा अंदाज घेऊन आधीच तयारी करणे, करियरची दीर्घकालीन योजना आखणे आवश्यक आहे. ‘पुढील पाच वर्षांत मला कुठे पोहोचायचे आहे?’, ‘माझे ध्येय काय आहे?’,‘ते गाठण्यासाठी मला कोणती नवीन कौशल्ये शिकण्याची गरज आहे?’, असे प्रश्न स्वतःला विचारून करियरचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. आपल्या करियरच्या ध्येयपूर्तीसाठी लागणाऱ्या कौशल्यांची व अनुभवांची निश्चित योजना बनविणे गरजेचे आहे.
श्रीकृष्ण- संघ निर्मिती (टीम बिल्डिंग)
संघ निर्मिती (टीम बिल्डिंग) म्हणजे विविध व्यक्तिमत्वे, कौशल्ये, आणि पार्श्वभूमी असलेल्या लोकांना एकत्र आणून,त्यांच्यात परस्पर विश्वास, सहकार्य आणि उद्दिष्टाभिमुखता निर्माण करणे. यामध्ये फक्त लोकांची निवडच नाही, तर त्यांना प्रेरित ठेवणे, योग्य जबाबदाऱ्या देणे आणि काम करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणेही समाविष्ट असते.
श्रीकृष्णाच्या जीवनातील उदाहरण :
कुरुक्षेत्र युद्धात पांडवांचा संघ हा विविध प्रकारचे स्वभाव, व्यक्तिसापेक्ष क्षमता आणि मर्यादा असलेल्या योद्ध्यांचा होता.
भीम : अतुलनीय बळ आणि जोश, पण प्रसंगी उग्र स्वभाव.
अर्जुन : श्रेष्ठ धनुर्धर आणि शूर लढवय्या, पण भावनिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील.
युधिष्टिर : धर्मनिष्ठ आणि संयमी, पण निर्णय घेण्यात विलंब
नकुल-सहदेव : कौशल्यपूर्ण पण कमी प्रसिद्ध
श्रीकृष्णाचा संघ बांधणी दृष्टिकोन :
१. प्रत्येकाची ताकद आणि कमकुवत बाजू ओळखून योग्य काम देणे.
२. भीमाला बलप्रयोगाची आवश्यकता असलेल्या मोहिमांवर पाठविणे.
३. अर्जुनाला निर्णायक क्षणी मुख्य आघाडी देणे.
४. युधिष्टिराला रणनीतिक चर्चा आणि नैतिक निर्णयांमध्ये पुढे मान देणे.
५. नकुल-सहदेव यांना सहाय्यक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणे.
करियर टूल : टीम तयार करताना फक्त कौशल्य न पाहता स्वभाव आणि परस्पर जुळवून घेण्याची क्षमताही महत्त्वाची. प्रत्येक सदस्यांची ताकद ओळखून त्यांच्या सामर्थ्यानुसार जबाबदाऱ्या व भूमिका देणे. संघात परस्पर विश्वास निर्माण केल्यास संकट काळात उद्दिष्ट साध्य होते.
श्रीकृष्ण – संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल )
संवादकौशल्य म्हणजे आपली मते, उद्दिष्टे, किंवा संदेश अशा प्रकारे मांडणे की तो समोरच्याला स्पष्ट समजेल, त्यावर विश्वास बसेल आणि तो कृती करण्यास प्रवूत्त होईल. श्रीकृष्ण हे याबाबतीत माहिर होते- त्यांचे शब्द फक्त माहिती देणारे नव्हते, परंतु प्रेरणादायी, परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करणारे होते आणि योग्य मार्गदर्शन करणारे होते.
१. थेट प्रेरणादायी संवाद
उदाहरण : कुरुक्षेत्र युद्धाच्या पहिल्या दिवशी अर्जुनाने आपल्या नातलंगाशी लढणे योग्य ठरेल का? असे विचारून आपल्या मनातील गोंधळ व्यक्त केला. परंतु श्रीकृष्णाने भगवतगीतेच्या ७०० श्लोकांमध्ये तत्वज्ञान, नैतिकता आणि कर्तव्य यांची सांगड घालून अर्जुनाचा मानसिक गोंधळ दूर केला. या पद्धतीने संवादातील तर्क आणि भावना व प्रेरणा यांचा अद्वितीय संगम भगवतगीतेत पाहण्यास मिळतो.
करियर टूल : स्टोरी टेलिंग अथवा कथाकथन हे तंत्र वापरून आपला विचार पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या कथा, दृष्टांत आणि उदाहरणे देऊन समजावणे.
२. योग्य शब्दांची निवड (चॉईस ऑफ वर्ड्स)
श्रीकृष्ण व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीनुसार शब्दांशी निवड करून आपले शब्दकौशल्य वारंवार गीताज्ञानातून दाखविले आहे. शांतिदूत म्हणून कौरव दरबारात जाताना राजनैतिक भाषेचा वापर, अर्जुनाला रणनीती सांगताना संक्षिप्त, स्पष्ट आणि आत्मविश्वास,मनोबल वाढविणारी भाषा आणि वृंदावनातील गोपिकांसोबत खेळकर आणि आनंदी भाषा अशारीतीने कृष्णाने परिस्थिती व व्यक्ती सापेक्ष पार्श्वभूमी समजून भाषेचा ढंग बदलला.
करियर टूल : श्रोत्यांची मनःस्थिती समजून स्वतःची संवादशैली विकसित करणे.
३. भावनिक बुद्धिमत्ता ( इमोशनल इंटेलिजन्स)
श्रीकृष्णाकडे समोरच्या व्यक्तीची भावनिक स्थिती ओळखण्याची विलक्षण कसब होते. त्याच्या या कौशल्यामुळे त्याला अर्जुनाच्या डोळ्यातील कर्तव्याचा गोंधळ दिसला. भीमाच्या रागात त्याला ऊर्जा व अन्यायाविरुध्द लढण्याची भावना दिसली.
करियर टूल : समोरच्याच्या भावनेशी जुळवून समोरच्याशी संवाद सुरु करणे आणि त्याला मग हळूहळू आपल्याला अपेक्षित भावना अथवा कृतीकडे नेणे. तसेच समोरच्याच्या भावना ओळखून संवाद हा सकारात्मक बनविण्याचा प्रयत्न करणे.
४. कर्मण्येवाधिकारस्ते : निष्काम कर्म करण्यास प्रेरणा
भगवद्गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे वचन श्रीकृष्णाच्या व्यवस्थापन तत्त्वांचा गाभा आहे. याचा अर्थ, ‘आपला अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्यांच्या फळावर नाही’.
करियर टूल : करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कामावर पूर्ण लक्ष दिले पाहिजे, ते काम सर्वोत्तम कसे होईल यावर भर दिला पाहिजे. समजा, तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करीत असाल तर, तुमचे सर्व लक्ष तो प्रकल्प यशस्वी करण्यावर असावे. त्याच्या यशामुळे मिळणाऱ्या मन-सन्मान किंवा अपयशामुळे होणाऱ्या टीकेचा विचार करू नये.
श्रीकृष्ण- वैचारिक समतोल साधणारा
स्थितप्रज्ञता: यश व अपयश दोन्हीमध्ये समतोल राखणे
भगवत गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची संकल्पना स्पष्ट केली आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती, जिचे मन सुखदुःख, जयपराजय, मानापमान या दोन्ही परिस्थितीत विचलित होत नाही, बुद्धी स्थिर राहते. श्रीकृष्णाच्या मते, अशा भावनांच्या लाटांमध्ये वाहून न जाता आपल्या बुद्धीला स्थिर ठेवणे आवश्यक आहे. यशस्वी करियर घडविण्यासाठी यशाचा स्वीकार विनम्रतेने आणि अपयशाचा स्वीकार धैर्याने करता आला पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती मिळाल्यास किंवा मोठ्या यशाने हर्षोल्हासीत होतो. याउलट, एखादा महत्वाचा प्रकल्प अयशस्वी झाल्यास किंवा त्याला बढती न मिळाल्यास तो निराश होतो.
करियर टूल : अपयशातून शिकून पुढे जाण्याची क्षमता आणि यशामुळे गर्व न बाळगता आपले पाय जमिनीवर रोवून ठेवणे, हे स्थितप्रज्ञतेचे लक्षण आहे. या गुणामुळे व्यक्ती संतुलित निर्णय घेऊ शकतो. स्थितप्रज्ञता: यश व अपयश दोन्हीमध्ये समतोल राखणे
श्रीकृष्ण- वाद निवारण कौशल्य
वाद निवारण कौशल्य म्हणजे मतभेद, वाद, किंवा तणावपूर्ण परिस्थिती शांततापूर्ण आणि प्रभावीपणे सोडवण्याची कला. यात केवळ भांडण थांबवणे नसून, दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा काढणे आणि दीर्घकालीन नातेसंबंध टिकवणे महत्वाचे असते.
उदाहरण: कुरुक्षेत्र युद्ध टाळण्यासाठी कौरव दरबारात ते शांतिदूत म्हणून गेले. संवादाद्वारे त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे. त्यांनी स्पष्ट पण बोलण्यात नम्रता ठेवून पांडवांचे हक्क मांडले. तसेच अतिशय कुशलतेने दुर्योधनाला युद्ध नको असल्यास सत्ता न सोडता पांडवांना दुसरी भूमी देण्याचा प्रस्ताव मांडला.
करियर टूल : दोन्ही बाजूंचे हित लक्षात घेऊन तोडगा सुचविणे तसेच पर्याय मांडून दोन्ही बाजूना समाधान मिळेल असा प्रस्ताव मांडण्याची कला विकसित करणे.
श्रीकृष्ण: आत्मज्ञानी व आत्म-मूल्यमापन करण्यात तरबेज
भगवतगीतेत कृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे महत्व सांगितले आहे. अर्जुनाला आपले कर्तव्य माहित नव्हते, परंतु कृष्णाने त्याला आत्मज्ञान करून दिले.
करियर टूल : करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी, स्वतःला ओळखणे सर्वात महत्वाचे आहे. आपल्या आवडी-निवडी, आपली कौशल्ये, आपली कमकुवत बाजू, आणि आपल्या ताकदीच्या बाजू आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. एकदा आपल्याला स्वतःची ओळख झाल्यावर, आपण योग्य करियरची निवड करू शकतो. ‘मी करियरमध्ये कुठे उभा आहे?’, ‘मी योग्य मार्गावर आहे का?’, असे प्रश्न स्वतःला विचारून आत्म-मूल्यमापन करणे महत्वाचे आहे.
श्रीकृष्ण : वेळेनुसार बदलण्याचे क्षमता असलेले व्यक्तिमत्व
कृष्णाने वेळोवेळी परिस्थितीनुसार आपली युद्धातील नीतीत बदल घडविले. त्यांनी युद्ध टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केले. काही ठिकाणी त्यांनी शांततेचा प्रस्ताव ठेवला तर जेव्हा त्यांना कळून चुकले की युद्ध अटळ आहे तेव्हा कूटनीतीचा वापर करून रणनीतीची आखणी केली.
करियर टूल : हीच निर्णायक लवचिकता आजच्या काळात आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन बाजारपेठा आणि नवीन स्पर्धा नवीन आव्हाने निर्माण करीत आहेत.
अशा परिस्थितीत, नवीन बदल स्वीकारून नवीन कौशल्ये शिकणे, नवीन भूमिका स्वीकारणे व नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे महत्वाचे आहे.
थोडक्यात, श्रीकृष्णाचे जीवन हे केवळ महाभारताची कथा नाही, तर ते एक व्यवस्थापनशास्त्र आहे, जे प्रत्येक काळात, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक करियरमध्ये मार्गदर्शक ठरते. म्हणूनच, श्रीकृष्ण हे खऱ्या अर्थाने ‘मॅनेजमेंट गुरु’ आहेत.
gourimanjrekar69@gmail.com