वेब वॉच: ‘पिल’ औषध उद्योगातील कडवट वास्तव

0
2
वेब वॉच:  ‘पिल’ औषध उद्योगातील कडवट वास्तव


सुहास किर्लोस्कर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

काही कार्यक्षेत्रांबद्दल लोकांच्या मनात सर्वसाधारणपणे भक्तिभावाची धारणा असते. त्यातील एखाद्या क्षेत्रात भ्रष्टाचार होत असतो, याची सुतराम कल्पना त्यांना नसते. त्या क्षेत्रातील दुष्कृत्ये उघडकीला आली, तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मानवी स्वभाव असतो. वैद्यकीय आणि औषधनिर्माण क्षेत्र ही त्यापैकीच. पूर्वी डॉक्टर हाताच्या नाडीचे ठोके बघायचे, स्टेथॉस्कोप वापरून रुग्ण तपासायचे आणि त्यांच्याकडील काही औषधे द्यायचे. आता अपवाद वगळता अनेक डॉक्टर रुग्णाला प्रत्यक्ष न तपासता काही तपासण्या करायला सांगतात. त्या रिपोर्टवरून निदान होऊ शकले तर काही औषधे लिहून देतात. ही औषधे त्या हॉस्पिटलमधल्या किंवा जवळच्या औषध दुकानातच मिळतात. अनेक औषधे नुकतीच बाजारात आलेली असतात. डॉक्टरांनी रुग्णांना त्यांची शिफारस करावी, यासाठी फार्मा कंपन्यांना बरेच प्रयत्न करावे लागतात. अनेक डॉक्टरांकडे रुग्णांप्रमाणे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हही रांगेत प्रतीक्ष करताना दिसतात. पुढे जाऊन एकाच प्रकारच्या तापावर ठराविक काळाने वेगवेगळी औषधे लिहून दिल्याचे रुग्णाला जाणवते.

फार्मा कंपन्या इतर प्रकारच्या उत्पादनांप्रमाणे जाहिरात करू शकत नाहीत. त्यामुळे औषधांचा प्रचार करण्यासाठी त्यांना वेगळ्या क्लुप्त्या शोधाव्या लागतात. कोणतेही औषध बाजारात आणण्यापूर्वी ंसंबंधित कंपनीला त्या औषधाचे टेस्टिंग करावे लागते.ती किती प्राण्यांवर, माणसांवर केली, याचा अहवाल तयार करावा लागतो. औषध तयार झाल्यावर स्पर्धक बाजारात उतरण्यापूर्वी आपल्या कंपनीचे उत्पादन बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांमध्ये विलक्षण स्पर्धा असते. त्यामुळे नियमानुसार करावयाच्या चाचण्यांमध्ये अनेकदा पळवाटा शोधल्या जातात. अशाच पळवाटा आणि त्यांचे होणारे दुष्परिणाम यावर स्पष्ट भाष्य करणारी ‘पिल’ ही वेब सिरीज जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. अशा क्लिष्ट विषयावरील एखादी मालिका तांत्रिक गती बरोबर ठेवतानाच ती उत्कंठावर्धक करण्याचे कौशल्य रविकुमार गुप्ता, परवेझ शेख, जयदीप यादव यांच्या पटकथेने साधले आहे.

या सिरीजच्या पहिल्या भागातील काही प्रसंगांतून या विषयाचे धागेदोरे प्रेक्षकांना उलगडू लागतात. हे प्रसंग असे… डॉ. प्रकाश चौहान (रितेश देशमुख) आपल्या साहेबाच्या निरोप समारंभावरून घरी परतत असताना त्याला आपली बढती आणि बदली झाल्याचे समजते.. एका फार्मा कंपनीमध्ये इन्स्पेक्शन करताना काही कागदपत्रे असणारी फाइल तिथला कर्मचारी फेकून देतो.. एका फार्मा कंपनीचा चेअरमन ऑफिस मिटिंगमध्ये जाहीर करतो की, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात खास नियुक्ती केली आहे. त्यांनी ज्यांची नेमणूक केलेली असते, ते प्रकाशचे साहेबच असतात.. प्रकाशची बदली ज्या ठिकाणी झाली आहे, तिथले काम फार्मा कंपन्यांचे इन्स्पेक्शन करणे हेच आहे.. मनासारखे काम करायला न मिळालेला एका वृत्तपत्रातील युवा पत्रकार कचरा डेपोवरून जात असतो, तेव्हा त्याला एक फाइल कचऱ्यात पडलेली दिसते.. यावरुन प्रेक्षकांना कथानकाचा अंदाज येऊ लागतो. कोणता तपशील केव्हा सांगावा आणि केव्हा सांगू नये, याची जाण ठेऊन पटकथा लिहिली असेल तर प्रेक्षकांना कसे खिळवून ठेवता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘पिल’चा पहिला भाग. ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘आमीर’ या चित्रपटांचे दिग्दर्शक रविकुमार गुप्ता यांच्याबरोबरच माहीम जोशी आणि जयदीप यादव यांनी या सिरीजचे उत्तम दिग्दर्शन केले आहे.

रितेश देशमुखने डॉ. प्रकाश या औषध कंपन्यांच्या इन्स्पेक्टरची भूमिका ताकदीने साकारत ओटीटीवर दमदार पदार्पण केले आहे. ‘इतके पुरावे समोर असताना हा काहीच का करत नाही?’ असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो, यामध्येच रितेशच्या अभिनयाचे कौशल्य आहे. सिरीजचा नायक हिंदी सिनेमाचा हिरो नाही. तो एक सरकारी नोकर आहे, त्याला नोकरी जाण्याची चिंता आहे. शिवाय, त्याला त्याचे काही व्यक्तिगत प्रश्नही भेडसावत असतात. सर्व बाजूंनी पिचलेला मध्यमवर्गीय सरकारी कर्मचारी लगेच क्रांती करण्यास धजावत नाही. नेहा सराफने साकारलेली बडबड करणारी बायको तिच्या नवऱ्याप्रमाणे प्रेक्षकांच्याही डोक्यात जाते, याचे श्रेय जाते तिच्या अभिनयाला आणि पंजाबी ढंगाच्या संवादांना द्यावे लागेल. पवन मल्होत्राला ओटीटीमुळे बऱ्याच कालावधीनंतर अभिनय कौशल्याला वाव देणाऱ्या भूमिका मिळत आहेत. अक्षत चौहान, अंशुल चौहान यांचे कामही स्तुत्य आहे. औषध कंपन्यांचे गूढ, गडद वातावरण दाखवणारी एक विशिष्ट रंगछटा या सिरीजला दिली आहे. प्रॉडक्शन डिझाइन पाहणाऱ्या दीप कुलकर्णी यांचे हे श्रेय. सुवरंग्षु सरकारांचे संकलनही उल्लेखनीय आहे. विशेषतः दोन प्रसंग समांतरपणे दाखवताना ते अधिक वेधक भासते. एकूणच, ही सिरीज प्रेक्षकांना औषधनिर्मिती उद्योगातील कडवट वास्तवाचे प्रत्ययकारी दर्शन घडवते.

जाता जाता.. एका प्रकरणाचा तपास करताना अनेक गंभीर बाबी कशा उघडकीला येतात, हे दाखवणारी याच प्लॅटफॉर्मवरील ‘चेर्नोबिल’ ही वेब सिरीजही लक्षवेधी ठरली आहे.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link