वेब वॉच: पावसाच्या थेंबांमध्ये जेव्हा उमलती माणिक – मोती…

0
19
वेब वॉच:  पावसाच्या थेंबांमध्ये जेव्हा उमलती माणिक – मोती…


सुहास किर्लोस्कर3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘स्वाती मुत्थीना मळे हनिये’मध्ये सिरी रविकुमार आणि राज शेट्टी यांनी कथेला साजेसा अभिनय संयतपणे साकारला आहे.

हलका पाऊस पडतोय.. त्याच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर मोबाइलवर गजर वाजल्याचा आवाज येतो.. पहाटेच्या अंधारातून एकदम खिडकीच्या आतला प्रकाश दिसतो.. एक स्त्री घरातले टॉयलेट साफ करते, भांडी घासते, मिक्सर सुरू करते.. आता दिवसाच्या प्रकाशात पाऊस पडतोय.. ती स्त्री घराबाहेर पडलेल्या फुलांचा सडा साफ करते, चहा करते, डोसा करताना दिसते.. कामासाठी तयार झालेली ती स्त्री आरशासमोर स्वतःला मूकपणे न्याहाळते. नवरा सोफ्यावर बसला आहे, तो त्याच्या लॅपटॉपमध्ये मग्न आहे. आयटीमध्ये काम करत असावा बहुदा. ती स्त्री सोफ्यावर बसलेल्या नवऱ्याला कॉफी आणून देते. तो लॅपटॉपमध्ये इतका मग्न आहे की, बायकोला हाय-बाय करत नाही. ती घराचा दरवाजा उघडून बाहेर येते. कोसळणाऱ्या पावसात कार चालवत असतानाच तिचा मोबाइल वाजतो…

‘निघालीस का ऑफिसला?’

‘हां अम्मा, तो जागा झाला का?’

‘तुझा भाऊ? तो झोपलाय अजून..’

‘आणि तुझी सून..?’

‘ती नेहेमीच लवकर उठते.

ती योगा करत असेल टेरेसवर..’

चार मिनिटांत अनेक शॉट्सचा कोलाज बघितल्यावर हा संवाद ऐकू येतो, तेव्हा प्रेक्षकाना बरंच काही समजलेलं असतं. त्याचवेळी कारच्या बंद काचेवर पावसाचे थेंब जमा झालेले दिसतात.. जणू मोत्याचे दाणेच! त्याचवेळी पडद्यावर अक्षरे उमटतात… Swathi Mutthina Male Haniye – ‘स्वाती मुत्थीना मळे हनिये’ म्हणजेच पावसाच्या थेंबांमध्ये उमलले माणिक-मोती.

चित्रपट ही चित्रभाषा आहे. त्यामुळं संवादापेक्षा दिसणाऱ्या चित्रांमधून, विविध शॉट्समधून प्रेक्षकांनी आपापले अर्थ काढावेत. ‘Show, don’t tell’ या तत्त्वानुसार प्रेक्षकांना हुशार समजून काढलेले चित्रपट दर्जेदार असतात, याचे प्रत्यंतर हा चित्रपट पदोपदी देतो. राज बी. शेट्टी या अभिनेत्याने चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनासोबतच मुख्य व्यक्तिरेखा साकारण्याची जबाबदारीही लीलया पेलली आहे. पहिल्या चार मिनिटांच्या अनेक शॉट्सच्या कोलाजमधून प्रेक्षकांना संवादाशिवाय बरंच काही समजतं. प्रेरणा (सिरी रविकुमार) घरातली सगळी कामं करून एक कौन्सेलर या नात्याने हॉस्पिटलमधील पेशंटचे म्हणणे / तक्रारी शांतपणे ऐकून घेते. तिचा नवरा सागर (सूर्या वशिष्ठ) घरामध्ये काहीही काम करत नाही. तिच्या अथक परिश्रमांची तिच्या नवऱ्याला कदर नाही. तो घरातली कामं टाळण्यासाठी सकाळपासून मोबाइल किंवा लॅपटॉप हातात घेऊन बसलेला असतो. ती अनेक व्याप सांभाळते, तरीही तिला ऑफिसला जाताना सोफ्यावर पाय पसरून बसलेल्या नवऱ्याला कॉफी द्यावी लागते. तिची सहकारी तिला एकदा विचारते,

‘मॅडम,

तुमचे ईअरिंग नवीन आहेत का?’

‘नाही, मॅच होतायत ना?’

‘हो, छान दिसतायत!’

या वाक्यात ती पटकन् सहकारी स्त्रीचा हात पकडते आणि प्रेक्षकांच्या लक्षात येते की, तिचं कौतुक करणारं कोणीच नाही. ती प्रेमाला, कौतुकाला पारखी झाली आहे. अशा क्षणी पार्श्वसंगीतात व्हायोलिन वाजते, कधी एक ठराविक धून वाजते, तीच धून वारंवार ऐकल्यावर प्रेक्षकांना त्याचे वेगवेगळे संदर्भ समजतात. या चित्रपटातील मिथुन मुकुंदन पृथ्वी यांचे पार्श्वसंगीत आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी हळूवार आहेत. तरल चित्रपटाला साजेसे संगीत असेल, तर त्या पार्श्वसंगीतातूनही अनेक दृश्ये अर्थवाही कसे होऊ शकतात, याची उत्तम प्रचिती या चित्रपटात येते.

अनेक पेशंटना समजून घेता घेता अनिकेत नावाच्या एका पेशंटचे (राज बी. शेट्टी) आगमन होते, जो कौन्सिलिंगला नकार देतो. हा पेशंट मितभाषी असतो. पण, अनिकेत आणि प्रेरणा यांच्याभोवती गुंफलेल्या अनेक दृश्यांतून माणुसकी म्हणजे काय, तिचा अभाव म्हणजे नेमके काय, अशा अनेक प्रश्नांचा अर्थ उलगडतो. प्रेक्षकांना तो जाणवतो, भिडतो आणि त्याची परिणती म्हणजे हा चित्रपट परिणामकारक ठरतो. प्राइमवर उपलब्ध असलेला हा चित्रपट कन्नडमध्ये असला, तरी मोजक्या संवादांमुळे भाषा ही अडसर ठरत नाही. दिग्दर्शकाच्या रुपातही अफलातून कामगिरी करीत राज शेट्टी यांनी हा चित्रपट म्हैसूर-उटी येथील निसर्गरम्य वातावरणात १८ दिवसात चित्रित केला. हे कसे शक्य झाले याबद्दल ते सांगतात की, बांधीव पटकथा लिहिण्यासाठी आपण बराच वेळ दिला. त्यामध्ये संकलन कसे करावे, याबद्दलही काही संकल्पना आधीच ठरवल्या होत्या. त्यामुळे मोजके आणि आवश्यक तेवढेच शूटिंग केले.

अशा चित्रपटाच्या कथेला साजेसा नैसर्गिक अभिनय सिरी रविकुमार आणि राज शेट्टी यांनी संयतपणे साकारला आहे. अर्थात, राज यांचे दिग्दर्शन ही चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहेच. हा चित्रपट म्हणजे एक मानवी मनाचा ठाव घेणारे एक तरल चित्र आहे. असे चित्र बघायचे असते, ते त्याची कथा काय आहे, त्यापेक्षा ती कशी सादर केली आहे, हे अनुभवण्यासाठी. कथेसोबत कॅमेऱ्याचीही भाषा समजून घेत आपली समज वाढवण्यासाठी हा चित्रपट जरुर बघावा.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link