वेब वॉच: जेव्हा गंभीर विषयातील ‘पाणी’च निघून जाते…

0
21
वेब वॉच:  जेव्हा गंभीर विषयातील ‘पाणी’च निघून जाते…


सुहास किर्लोस्कर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

दिग्दर्शक म्हणून कथेतील संघर्ष दाखवण्याऐवजी आदिनाथ कोठारेंनी स्वतःचा नायक केंद्रस्थानी ठेवल्याने या सिनेमात काही ‘पाणी’च राहिले नाही.

महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा ज्वलंत प्रश्न भेडसावतो. जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी गावागावांत चर खोदण्याचे काम पाणी फाउंडेशनने सुरू केले. ते करताना श्रमदानासाठी ग्रामस्थांना एकत्र आणणे, त्यांच्यात या नवीन संकल्पनेविषयी विश्वास निर्माण करतानाच त्यांना एकजुटीने या एका उद्देशासाठी प्रेरित करण्याचे काम या गावांमध्ये करण्यात आले. ‘पाणी’ हा सिनेमा म्हणजे त्यातीलच एका गावकरी युवकाची कहाणी. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा नुकताच प्राइमवर उपलब्ध झाला आहे.

अशा संकल्पनेवरील सिनेमासाठी पटकथाही सशक्त असायला हवी. नितीन दीक्षित यांनी अशी पटकथा उभी केली आहे. नागरदवाडीतील पाण्याच्या समस्येमुळे गावकरी असलेल्या नायकाशी लग्न करण्यास नायिका नकार देते आणि त्यामुळे नायक जिद्दीने पेटून उठतो. हे कथानक सत्यघटनेवर आधारित आहे. मग गावकऱ्यांचा विरोध, गावातील राजकारणी लोकांनी ठरल्याप्रमाणे काम बंद करण्यासाठी काही गुंड पाठवणे, ते सापडणे आणि त्यातून नायकाचे नेतृत्व गावकऱ्यांनी स्वीकारणे या चिरपरिचित क्रमाने ही पटकथा पुढे सरकते. दिग्दर्शक आदिनाथ कोठारेंनी कथेतील संघर्ष प्रभावीपणे पुढे आणून हा सिनेमा चित्रित न करता स्वतःच साकारलेला नायक सतत दाखवण्याचा मार्ग पत्करल्याने सिनेमा अपेक्षित परिणाम साधत नाही.

अर्जुन सोरते यांची सिनेमॅटोग्राफी ही सिनेमाची त्यातल्या त्यात सर्वात उजवी बाजू. निव्वळ अर्थपूर्ण फ्रेम्स, बोलका कॅमेरा अनुभवण्यासाठी हा सिनेमा बघावा. चित्रपटाचा ओपनिंग सीन कमालीच्या कौशल्याने चित्रित केल्यामुळे अपेक्षा वाढतात आणि पुढेही या सिनेमॅटोग्राफीने अशीच कमाल दाखवली आहे. फोकस-आउट ऑफ फोकसचा खेळ मराठी सिनेमांमध्ये यापूर्वी इतक्या प्रभावीपणे फार कमी प्रमाणात बघण्यास मिळाला आहे.

आदिनाथ कोठारे यांचा हनुमंत केंद्रे हा गावातील युवक पटवून घ्यावा लागतो. सिनेमामध्ये ‘नायक’ आदिनाथ कोठारे नसलेले प्रसंग जवळपास नाहीतच. गावातला हा युवक सर्वांना एकत्र आणतो. पुरुषांना एकत्र आणणारा युवक तोच आणि स्त्रियांची एकजूट करणाराही तोच. गावकरी एकत्र आले, तरी विहीर खणून पाणी पहिल्यांदा कोणाला सापडते, या प्रश्नाचे उत्तरही एकच. ऋचा वैद्य यांनी ‘सुवर्णा’ ही नायिका साकारताना एकाच चेहऱ्याने वावरण्याची खबरदारी घेतली आहे. नायिकेच्या मेकअपमध्येही अनेक प्रसंगांत विसंगती दिसतात. कधी तिला सुंदर, तर कधी सामान्य दाखवले आहे. त्यामध्ये एकसमान धागा किंवा विचार दिसत नाही. सुबोध भावे प्रत्येक मराठी चित्रपटात दिसत असले, तरी मराठी चित्रपट यशस्वी ठरण्याचा तो फॉर्म्युला नाही, हे सिद्ध झाले आहे.

शिवाय, ते सगळीकडे एकाच पद्धतीचा अभिनय करतात, त्यातही वैविध्य नाही. ‘नाबार्ड’च्या अधिकाऱ्याचे काम रजत कपूर यांनी केले आहे. विशेष म्हणजे, सुबोध भावे आणि रजत कपूर सिनेमाच्या सुरूवातीनंतर कथेतून गायब झाले आहेत. गिरीश जोशींनी साकारलेले प्रमोद हे प्रारंभी नायकाला मार्गदर्शन करताना दिसतात, पण मराठी नायक चतुर आणि चतुरस्त्र असल्यामुळे पटकथा लेखकाने हा मार्गदर्शक पुन्हा चित्रपटात दिसणार नाही, याची जणू खबरदारी घेतली आहे.

या सिनेमाचा नायक आणि दिग्दर्शक स्वत: आदिनाथ कोठारेच आहेत. नायकाने पहार मारल्यावर सापडलेल्या पाण्याचा फवारा इतका मोठा आहे की, त्याच्या उंचीपेक्षाही उंच तुषार निरंतर उडत राहतात आणि त्या पाण्यातून नायक विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या नायिकेकडे पाहतो! टीमवर्कचे महत्त्व दाखवण्याऐवजी सगळा बदल एकटा नायक घडवून आणतो आणि हे अविश्वसनीय वाटते. नागदरवाडीमध्ये पाणी सापडले असले, तरीही पटकथा लिहिताना, दिग्दर्शन करताना हा विषय पाण्यावर केंद्रित करण्याऐवजी नायकाच्या प्रेमावर केंद्रित केल्याने त्याचा प्रभाव पडत नाही. आणखी एक मराठी सिनेमा बघितला, एवढेच समाधान त्यातून मिळते. हनुमंत आणि सुवर्णा यांचे लग्न होते, ते त्याने केलेला पण पूर्ण केल्यामुळे, हे निर्विवाद. पण, त्याचे चित्रीकरण करताना अनेक शिलेदारांपैकी एक असे न दाखवता त्याला हिरो केले आहे.

पटकथा – संवाद लेखनासोबतच नितीन दीक्षित यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु, आदिनाथ कोठारेंनी नेमके काय दिग्दर्शन केले, हे शोधावे लागते. अर्थात दीक्षित यांनी लिहिलेल्या कथेचा विस्तार आदिनाथ यांनी केल्याचे श्रेयनामावली सांगते. अनमोल भावे यांचे ध्वनी संयोजन उत्तम. पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा विषय महाराष्ट्राच्या मातीतला आहे. पण, त्यावर प्रभावी सिनेमा झाला असता, तर तो गावोगावी दाखवून त्याद्वारे जनजागृती होऊ शकली असती, अशी खंत नंतर वाटत राहते.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link