वेब वॉच: ‘उल्लोळूक्कू’ मानवी स्वभावाचे पाण्याने उलगडलेले अंतःप्रवाह…

0
16
वेब वॉच:  ‘उल्लोळूक्कू’ मानवी स्वभावाचे पाण्याने उलगडलेले अंतःप्रवाह…


सुहास किर्लोस्कर4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘उल्लोळूक्कू’तील पात्रांच्या मनाचा ठाव घेताना प्रेक्षक स्वत:च्याच मनातील अंतःप्रवाहाचा शोध घेत राहतात.

मुला-मुलीचे लग्न आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार होत असेल, तर त्यातच दाम्पत्याचे हित सामावलेले असते, हा पालकांनी आणि समाजाने पसरवलेला समज आहे की गैरसमज? आई-वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून लग्न करावे का? का करावे? प्रेमविवाह करण्याला आई-वडिलांचा विरोध का असतो?

सर्वसाधारणपणे कमावते झाल्यावर म्हणजेच आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर वर-वधू निवडण्याचे स्वातंत्र्य युवकांना का दिले जात नाही? समजा एखाद्या मुलीने स्वतःच्या प्रेमाला तिलांजली देऊन आई-वडिलांच्या इच्छेनुसार विवाह केला, तर तो विवाह यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते का? अशा लग्नानंतर नवरा निवर्तला, तर त्या स्त्रीने स्वतःच्या प्रेमाला पसंती द्यावी की सासूची सेवा करत राहावे? अशा परिस्थितीत ती तिच्या आई-वडिलांकडे परत गेली, तर आई-वडील तिला का स्वीकारत नाहीत? लग्न ही खासगी बाब आहे, तर त्यात समाज लुडबुड का करतो?

असे अनेक प्रश्न ‘उल्लोळूक्कू’ (अंत:प्रवाह) हा ‘प्राइम’वरील मल्याळी चित्रपट बघताना पडतात आणि हे त्या चित्रपटाचे यश आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात मोजकेच संवाद आहेत, त्यामुळे भाषेचा विशेष अडसर नाही. मल्याळी चित्रपट ग्रेट का असतात, याचे प्रत्यंतर हा चित्रपट बघताना पदोपदी येत राहते. मल्याळी भाषेतील चित्रपट तिथल्या मातीतले असतात. केरळमधील घरांमध्ये बॅकवॉटरचे पाणी घुसणे, हे त्यांच्या आयुष्याचा भाग बनले आहे. गाव, घरे बॅकवॉटरच्या जवळपास असल्यामुळे दरवर्षी असे घडत असते. त्यामुळे घराघरात घुसलेले पाणी त्यांच्या सवयीचे झाले आहे. याच काळात घरामध्ये एखादी घटना घडल्यावर अनेक नातेवाईक / शेजार-पाजारचे लोक जमतात. सगळेच काम ठप्प झाल्यामुळे एकत्र वास्तव्य केल्यावर त्यांचे स्वभाव दिसतात, त्यांच्यातल्या उणिवा जाणवतात आणि खरे रूप बाहेर येते. सगळे काही साचलेल्या पाण्यासारखे. पटकथा लेखक- दिग्दर्शक ख्रिस्तो टोनी यांनी पाण्याचा वापर कथेच्या अनुषंगाने; पण अनेक अर्थाने फारच कौशल्याने केला आहे.

‘कोई पत्ता हिले, हवा तो चले.. कौन अपना हैं, ये पता तो चले..’ या जफर कलीम यांच्या गझलप्रमाणे एखादे संकट ओढवल्यावर माणसांचे खरे स्वभाव कळतात. आपली माणसे कोण आहेत आणि मतलबी कोण आहेत, याचे प्रत्यंतर ‘याचि देही याचि डोळा’ येते. “उल्लोळूक्कू’ बघितल्यावर हेच विचार मनात येत राहतात. पार्वती या अभिनेत्रीने ‘छपाक्’ चित्रपटाचा मूळ चित्रपट “उयरे’, ‘बेंगलोर डेज’ अशा चित्रपटांतून उत्तम अभिनय केला आहे. ‘उल्लोळूक्कू’मध्येही त्याचेच प्रतिबिंब उमटते. अभिनेत्री उर्वशी यांनी केलेली सासूची भूमिका मानवी स्वभावाच्या अनेक छटा दाखवणारी आहे. हा मल्याळी चित्रपट खरे तर या दोघींचा भावूक, पण संयमित अभिनय अनुभवण्यासाठी पुन्हा बघायला हवा, कारण पहिल्यांदा चित्रपट बघताना सर्वसाधारणपणे आपले लक्ष कथेकडे असते. या चित्रपटातले तिसरे महत्त्वाचे पात्र म्हणजे, पाणी. या पाण्याचा वापर चित्रपटात सर्वत्र अनेक रुपात दिसतो. त्याला वेगळा अर्थ देण्याची कामगिरी दिग्दर्शकाने बेमालूमपणे केली आहे. या चित्रपटात भावनांचे उत्कट दर्शन आहे, पण तो मेलोड्रामा नाही. यामध्ये बरोबर कोण आणि चूक कोणाची, हे शोधताना आपल्या लक्षात येते की, ही आजूबाजूला दिसणारी माणसेच आहेत, ज्यामध्ये कोणी खलनायक नाही किंवा कोणी एक नायक नाही.

उर्वशी यांनी या चित्रपटाबद्दल एका मुलाखतीत सांगितले की, चाळीस दिवस गुडघाभर पाण्यात शूटिंग करतानाचा अनुभव अक्षरशः दमछाक करणारा होता. तरीही कलाकार, दिग्दर्शक, कॅमेरामन (शेहनाद जलाल) आणि सर्वच स्टाफने अथक प्रयत्न करून चित्रीकरणात उत्तम कामगिरी केली आहे. ‘आतापर्यंतच्या माझ्या ७५० चित्रपटांच्या करिअरमध्ये फक्त याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आम्हा कोणालाच धमाल करता आली नाही,” असे उर्वशी यांनी सांगितले. दिग्दर्शक टॉमी यांनी या चित्रपटाचे शूटिंग स्वतःच्या घरामध्येच केले, हे विशेष. चित्रपटाची कल्पना कशी सुचली, याबद्दल टॉनी यांनी सांगितले की, आपल्या आजोबांचे निधन झाल्यावर त्या दिवसात सगळीकडे केरळच्या बॅकवॉटरचे पाणी साचल्यामुळे आजोबांचा मृतदेह घरामध्ये सात दिवस ठेवावा लागला. ते सात दिवस घरातल्या सर्वांसाठी फारच कठीण होते. त्या आठवणी आम्ही कोणीच विसरू शकत नाही. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर एक कथा सुचली. शूटिंगसाठी अन्य काही लोकेशन बघितली, पण चाळीस दिवस साचलेल्या पाण्यात शूटिंग करण्यासाठी त्या जागा योग्य नव्हत्या. त्यामुळे ते आमच्याच घरी केले.

कोणत्याही चित्रपटातल्या पात्रांना पडलेले प्रश्न तो संपल्यावरही आपला पिच्छा सोडत नसतील, तर तो चित्रपट उत्तम समजावा, या मापदंडावर ‘उल्लोळूक्कू’ उत्कृष्ट चित्रपट ठरतो. चित्रपटातील दोन पात्रांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा विचार करता करता प्रेक्षक आपल्याच मनातील अंतःप्रवाहाचा शोध घेत राहतात. मल्याळी चित्रपटात ‘मार्केटमध्ये कशाची चलती आहे?’ याचा विचार न करता तिथल्या मातीतलेच, रोजच्या आयुष्यातील प्रश्न चित्रपटाच्या भाषेत मांडले जातात. म्हणूनच आज ते भारतात सर्वोकृष्ट ठरत आहेत. दुर्दैवाने मराठी चित्रपट त्या दर्जाच्या आसपासही पोहोचत नाहीत.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link