डॉ. रोहन चौधरी3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
व्ही. एस. श्रीनिवास शास्त्री
तुम्ही दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहराला भेट द्याल तेव्हा तेथे तुम्हाला शास्त्री नावाचे महाविद्यालय दिसेल. शिक्षणाशिवाय भारतीयांची प्रगती अशक्य आहे, हे जाणून भारतीयांच्या प्रत्यावर्तनासाठी आफ्रिकेत गेले असताना व्ही. एस. श्रीनिवास शास्त्री या भारतीय मुत्सद्द्याने १९२९ मध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली. आपल्या मुत्सद्देगिरीच्या कौशल्यावर आफ्रिकेतील भारतीयांच्या प्रश्नांना जागतिक पातळीवर वाचा फोडणारे हे नाव आपल्या देशातील लोकांसाठी नवे असले, तरी आफ्रिकेत म. गांधी यांच्यानंतरचा इतिहासातील सर्वात लोकप्रिय भारतीय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
पहिल्या महायुद्धानंतर १९२१ मध्ये प्रथमच वासाहतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांच्या प्रयत्नांमुळे या परिषदेत भारतीय प्रतिनिधीला उपस्थित राहण्याचा अधिकार होता. तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड चेम्स्फोर्ड यांनी शास्त्री यांना या परिषदेसाठी नामांकित केले होते. युद्धोत्तर परिस्थितीत ब्रिटनचे धोरण आणि वसाहतींची भूमिका हा या परिषदेचा मुख्य अजेंडा होता. याचाच अर्थ भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्याला विशेषत: आफ्रिकेतील भारतीयांच्या प्रश्नाला बगल देण्यात आली होती. तत्कालीन दक्षिण आफ्रिकेचे प्रधानमंत्री क्रिस्चियान स्मट्स आणि विन्स्टन चर्चिल यांचीही या विषयावर चर्चा होऊ न देण्याची किंवा किमान ती लांबवण्याची योजना होती. परंतु, त्यांची ही योजना शास्त्री यांनी केवळ उधळूनच लावली नाही, तर श्वेतवर्णीयांचा प्रभाव मोडीत काढून वासाहतिक परिषदेत आपला प्रस्ताव मंजूरही करून घेतला.
वासाहतिक परिषदेत या प्रस्तावावर ८ जुलै १९२१ ला शास्त्रींनी केलेले भाषण हे मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातील ऐतिहासिक भाषण मानले जाते. आपल्या नागरिकांचे रक्षण करणे हा त्या त्या देशाचा मूलभूत अधिकार आहे आणि समानता हा ब्रिटिश वसाहतीमधील सर्व भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे हे आपल्या भाषणात त्यांनी ठणकावून सांगितले होते. ब्रिटिशांचा भारतावरील प्रभाव हा फक्त वांशिक समानतेतूनच अबाधित राहू शकतो याची जाणीव करून देत समानतेचे तत्त्व तातडीने राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्राच्या अधिकाराइतकेच मानवी अधिकारही महत्त्वाचे आहेत अशी मांडणी जागतिक राजकारणात १९९० च्या दशकात करण्यात येत होती. या मांडणीमुळे सुरक्षेच्या संकल्पनेत मूलभूत बदल झाले. वैशिष्ट्य म्हणजे सिन्हा यांनी वसाहतिक परिषदेतील आपल्या ऐतिहासिक भाषणातच लोकांचे हक्क आणि राष्ट्राचे हक्क या विषयावर सैद्धांतिक मांडणी केली होती. जागतिक नैतिकतेचे आपणच वाहक आहोत, असे बिंबवण्यात पाश्चिमात्य देश यशस्वी ठरल्याने शास्त्रींची ही मांडणी मुत्सद्देगिरीच्या इतिहासात तुलनेने दुर्लक्षित राहिली असली तरी तिचे महत्त्व पुढच्या काळात अजिबात कमी झाले नाही.
प्रधानमंत्री क्रिस्चियान स्मट्स यांच्या प्रखर विरोधानंतरही वसाहतिक परिषदेत शास्त्री यांनी मांडलेला ठराव मंजूर झाला. त्याद्वारे ब्रिटिश वसाहतीतील भारतीयांचा मूलभूत अधिकार मान्य करण्यात आला. भारतीय मुत्सद्देगिरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा हा क्षण होता. मुत्सद्देगिरीच्या इतिहासात प्रथमच भारताच्या मागणीला प्राधान्य दिले गेले. त्यांच्या या कौशल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना वॉशिंग्टन परिषदेमध्ये भारताचा मुख्य प्रतिनिधी म्हणून पाठवले. १९२२ मध्ये त्यांनी भारतीयांच्या समानतेचा हा मुद्दा घेऊन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडातील परिषदांमध्ये भाग घेतला. १९२३ मध्ये केनियाचा प्रश्न घेऊन त्यांनी इंग्लंडचा दौरा केला. ब्रिटिश वसाहतीत ब्रिटिशांच्याच अनुपस्थितीत झालेला पहिला आणि कदाचित एकमेव करार असलेल्या १९२६-२७ च्या ‘केपटाऊन समझोता परिषदे’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गांधीजींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी भारताचे दक्षिण आफ्रिकेतील पहिले एजंट म्हणूनही जबाबदारी स्वीकारली.
मन परिवर्तन करणे हे मुत्सद्देगिरीचे सर्वात मोठे यश असते, या कसोटीवरदेखील शास्त्री यांचे योगदान मोठे आहे. शास्त्रींच्या भाषणाने ब्रिटिश मंत्रिमंडळ कसे प्रभावित झाले आणि स्मट्स यांचा ढोंगीपणा कसा उघड झाला हे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हड लॉइड जॉर्ज यांनीच शास्त्री यांना सांगितले होते. खुद्द शास्त्रींनीच आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रात हा किस्सा नमूद केला आहे. फक्त ब्रिटिश पंतप्रधानच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान विल्यम ह्यूज, न्यूझीलंडचे पंतप्रधान विल्यम मेसे यांनीही शास्त्रींच्या भाषणाने प्रभावित होऊन त्यांच्या मागणीला समर्थन दिले होते. कॅनडाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी उपपंतप्रधान जोसेफ पोप यांना ओटावापासून ते व्हिक्टोरियापर्यंत चक्क चार दिवसांचा प्रवास करून शास्त्रींचे स्वागत करण्यासाठी पाठवले होते. शास्त्रींच्या या मोलाच्या कार्यामुळेच ‘भारतीय कूटनीतीचा उद्गाता’ ही बिरुदावली त्यांना सार्थ ठरते.
(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)







