लोक-संचित: वाढविता लोभ होईल उशीर

0
14
लोक-संचित: वाढविता लोभ होईल उशीर


प्रवीण दशरथ बांदेकर9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

वर्षभर या स्तंभलेखनाच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधता आला. विशेषतः रोजच्या जगण्यातील साध्या – साध्या प्रसंगांच्या आधारे आपल्या स्वभावातील काळ्या-पांढऱ्या गोष्टींचा शोध घेता येतो का, हे पाहण्याचा प्रयत्न या निमित्ताने करावा, असं मनात होतं. त्यासाठी आपल्या लोकपरंपरेतील जगदगुरू तुकाराम महाराजांसारख्या संतांचा आधार घ्यावा, असंही ठरवलं होतं. त्या अनुषंगाने चाचपडत चालताना जे हाती आलं, ते तुमच्याशी वाटून घेतलं. आज या सदर लेखनाचा शेवट करतानाही आपल्या आत खणताना गवसलेलं काही तुमच्यासमोर ठेवत आहे.

मुलाने हट्टानं घरात एक मांजर पाळली आहे. घरात करमलं नाही की ती बाहेर भटकायला पळते. बाहेरून आली की तिच्या पावलांचे ठसे पांढऱ्या शुभ्र फरशांवर इथे तिथे ओळीने उमटवत जाते. पावसाळी दिवसांत तर बाहेरची सगळी चिखलमाती घरात घेऊन येते. हे सगळं कुणी साफ करायचं? यावरून मग घरात वादावादी. कामवाली ताईही करवादत राहते. मांजरीला लाडावून ठेवलं आहे घरवाल्यांनी.. प्राणी पाळायची इतकी हौस असेल तर त्यांची साफसफाई पण आपणच करावी.. ती दुसऱ्या कुणी का म्हणून करायची?

मातीभरले पाय घेऊन मांजराचं घरात येणं, फरशीवर, सोफ्यावर, बेडवर, किचनच्या ओट्यावर, घरात सगळीकडं पदचिन्हं उमटवंत फिरणं आता रोजचंच झालं आहे. त्यावरून उडणाऱ्या चकमकींचीही सवय झाली आहे. पण, मांजरीची ही घरात आलेली धूळपावलं नेहमीच मला माझ्या लहानपणच्या एका प्रसंगाची आठवण करून देतात. तेव्हाच्या दिवसांत खेड्यांत राहणाऱ्या आमच्यासारख्या मुलांना मुंबईचं मोठंच आकर्षण असे. मुंबईवाले चाकरमानी गणेश चतुर्थी, होळी यांसारख्या सणांच्या निमित्ताने वा मे महिन्याच्या सुटीत बायकोमुलांसह गावी यायचे. तेव्हा त्यांची किती बडदास्त ठेवली जायची ते आम्ही पाहत असू. त्यांची आमच्या तोंडच्या बोलीभाषेपेक्षा वेगळी मराठी (आम्हाला तेव्हा ती ‘शुद्ध’ मराठी भाषा वाटत असे. आमची भाषा गावंढळांची, अशुद्ध भाषा असं आम्ही समजायचो.), अधूनमधून हिंदी, इंग्रजी शब्दांचा वापर, इंग्रजीतीलच अपशब्द, त्यांचे स्वच्छ कपडे, क्रिकेटची कॉमेंट्री वगैरे ऐकायला आणलेला ट्रान्झिस्टर, सोनेरी पट्ट्याचं चावी न देता चालणारं घड्याळ, पटापट गणित करणारा कॅल्क्युलेटर हे सगळंच आमच्यासाठी अद्भुत असं काहीतरी असे. या गोष्टी तेव्हाच्या काळात गावात अभावानेच दिसायच्या. त्यामुळे मुंबई म्हणजे आमच्यासाठी परग्रहासारखी असलेली वेगळी अशी दुनिया आणि मुंबईकर म्हणजे जणू त्या परग्रहावरची माणसं असंच वाटत असायचं. तशातच एकदा कधी तरी मी पाचवीत वा सहावीत असताना मुंबईला जायची संधी मिळाली. त्याच्याआधीही गेलेलो असेन घरच्यांसोबत, पण थोडं फार कळायला लागल्यानंतरच्या आठवणीतली ही पहिली मुंबई भेट. नात्यातल्या चुलत किंवा आत्येबहिणीचं वगैरे लग्न होतं. त्यासाठी आईबाबांबरोबर आम्ही मोठ्या चुलत्यांच्या फ्लॅटवर मुक्कामासाठी गेलो होतो. कोकणातून मुंबईला जाणाऱ्या एसटीच्या गाड्या रात्रभरचा प्रवास करून पहाटे परळला पोहोचत असत. तिथून टॅक्सी वगैरे करून काकांच्या फ्लॅटवर गेलो होतो. पोहोचल्या पोहोचल्या काकीने आम्हाला बाथरूममध्ये पाय धुवायला पिटाळलं होतं. ही काकी तिच्या फटकळपणासाठी प्रसिद्ध होती. आल्या आल्या तिनं तोंडाचा पट्टा सुरू केला होता.. ‘गावातून आलेत धुळीनं भरलेले पाय घेऊन.. माझी फरशी मळवून ठेवाल, तर पुसायला लावीन, सांगून ठेवतेय आधीच. पाय स्वच्छ धुऊन, पुसून मगच इकडं तिकडं फिरा काय ते..’

म्हटलं तर हे तसं किरकोळ होतं. पण, मला उगाचच ते मनाला लागलेलं. गावात, आमच्या घरी शेणाचं सारवण असलेल्या मातीच्या जमिनी. तिथं असे फरशीवर धुळीचे पाय दिसण्याचा प्रश्नच आला नव्हता. बाहेरून हुंदडून घरात आल्यावर न्हाणीघरात जाऊन हातपाय धुण्यासाठी आईचा ओरडा असायचा, पण तरीही हा असला शहरी शिष्टपणा नव्हता. माझे आईबाबाही तेव्हा या तिच्या बोलण्याने नाराज झाले असावेत. त्यांच्या बोलण्यात नंतर हा विषय वारंवार यायचा.

काळ कसा भराभर पलटत असतो. शहरातल्या त्या काकूचं ते बोलणं मला तेव्हा खटकलं होतं. गावातल्या आमच्यासारख्या खेडवळ लोकांना, मातीशी नैसर्गिक नातं असणाऱ्यांना हिणवणारं वाटलं होतं. पण, आज आमच्याकडं गावात तरी काय परिस्थिती आहे? खेड्यापाड्यांतही मातीची घरं, शेणानं सारवायच्या जमिनी आजकाल फारशी कुठं दिसत नाहीत. चकाचक फरशा बसवल्या गेल्यात घरांच्या जमिनींवर. मातीत मळलेले पाय घेऊन कुणी घरात आलं की लगेच उठून दिसतात ठसे. पण, मातीशी, शेतीशी संबंध असलेल्यांच्या घरात मातीत मळलेले पाय येणार ना! खेड्यात राहणाऱ्यांनीही शेती करणं सोडून दिलं असेल, तर कुठली माती नि कुठले मातीभरल्या पावलांचे ठसे? आमचीही मानसिकता आता त्या शहरी काकूसारखीच बनत चालली असावी. त्यामुळे साधं मांजरही मातीलागल्या पायांनी स्वच्छ चकचकीत फरशीवर आलेलं आम्हाला खपत नसावं. आता अशा परिस्थितीत कुणी कुणाला नावं ठेवावीत? कुणाला हिणवावं? शेवटी काय, सगळ्यांचेच पाय मातीचे, हेच खरं. खरं तर हे सगळं मनात यायचं कारणही अगदीच वेगळं आहे.

आपल्या रोजच्या जगण्या-वागण्यातली ही विसंगती समाजमनाला दिशा देणाऱ्यांपर्यंतही कशी पसरत गेली आहे, हे या निमित्तानं मला जाणवलं होतं. गेल्याच महिन्यात साहित्य अकादमीचे प्रतिष्ठेचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. गेल्या काही वर्षांपासून अकादमी मिळवणाऱ्या साहित्यिकांमध्ये मुंबई-पुण्यापेक्षाही ग्रामीण भागात राहून लिहिणारे जास्त दिसू लागलेत. साहित्याचं केंद्र महानगराकडून ग्रामीण भागाकडं सरकू लागल्याचं हे निदर्शक असावं, कदाचित. पण, सदानंद देशमुख, आसाराम लोमटे, श्रीकांत देशमुख, कृष्णात खोत यांसारख्यांच्या ग्रामीण संवेदनांच्या लेखनाला, स्वतःला तथाकथित आधुनिक म्हणवणारे काही लेखक-समीक्षक काळाच्या मागे राहिलेलं, साचेबंद स्वरूपाचं, परंपरावादी, कमअस्सल वगैरे संबोधत नाकं मुरडतात, हे मला माहीत होतं. त्यामुळंच त्यांच्या दृष्टीने ग्रामीण अवकाशातील साहित्याचा राष्ट्रीय पातळीवर असा सन्मान सातत्याने होत जाणं खरं तर धक्कादायक होतं. पण, अलीकडं हेच लोक ग्रामीण साहित्याची, त्यातल्या संघर्षमय जगण्याची तरफदारी करू लागलेले पाहताना गंमत वाटते.

एकीकडं सगळ्या मूल्यपरंपरांचा, विचारधारांचा अंत झाला आहे, असं म्हणायचं नि दुसरीकडं वैश्विक मूल्यांचा साक्षात्कार होत असलेलं अस्सल भारतीय मातीतलं साहित्य हेच खरं साहित्य आहे, असंही बोलत राहायचं. हे पाहतानाही साहजिकच, कधीतरी यांना आपल्या वर्तनातील ही विसंगती जाणवत असावी काय, असंच मनात येत राहतं. कालचे आपण खरे असतो की आजचे, हा तर नेहमीच गोंधळात टाकणारा प्रश्न आहे माझ्यासाठी. काल आपली पावलं धूळभरली होती, आज दुसऱ्या कुणाची तरी. पण, आपला अभावाचा भूतकाळ आपण किती सहजपणे नजरेआड करतो आणि वर्तमानाला वाकुल्या दाखवत खिजवत राहतो. खरं तर आपणही काल याच अवस्थेतून जात होतो, हे मात्र आपण सोयीनं विसरलेलो असतो.

आपल्या वर्तनातील अशा विसंगतींची सातत्याने चिकित्सा करत राहणारे तुकोबांसारखे महान संत म्हणूनच वेगळे ठरतात. जे आपल्यापाशी नाही त्याचा सहजपणे स्वीकार करणं आणि जे आहे त्याचा कसलाही पोकळ अभिमान न बाळगणं ही गोष्ट अंगी बाणवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नसावं. वाढविता लोभ होईल उसीर। अवघीच स्थिर करा ठायी।। असं सांगणाऱ्या तुकोबांना जगण्यातलं हे मर्म नेमकेपणानं सापडलं होतं. ज्ञानोबा माउलींनी मांडलेला विश्वव्यापी मानवतावाद तुकोबांनी सर्वसामान्यांशी जोडून घेत अधिकाधिक खोलवर पोहोचवला. हा वारसा जपता येईल का, हेच गेले वर्षभर आपणाशी केलेल्या संवादातून शोधण्याचा माझा प्रयत्न होता. आता माघारी फिरताना, तुकोबांच्याच शब्दांचा आधार घेत शेवटी म्हणेन… तेथे उणे पुरे तुम्ही जाणा।।

(संपर्क – samwadpravin@gmail.com)



Source link