Maharashtra Unseasonal Rain : हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Rain) अक्षरशः झोडपून काढलं आहे. या अवकाळी पावसाचा फटका ग्रामीण भागासह शहरी भागांना देखील बसला आहे. तर यावेळी आलेल्या या पावसाने बळीराज्याच्या तोंडचा घास हिरवल्याचे चित्र आहे. ज्यामध्ये कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शेतकरी भरडला गेला आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. एकीकडे आखतातील युद्धामुळे महागाईचा भडका उडाला असताना आता अस्मानी संकट उभे ठाकले आहे. परिणामी या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.
Satara News : मोठ्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांनी बसवलेले सोलर पॅनल्स फुटले
सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात भल्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्याने शेती पिकांसह जनावरं, घरे आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. उंडाळे आणि मस्करवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. कराड तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांना अक्षरशः हैराण करून सोडलं. उंडाळे गावात पडलेल्या मोठ्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांनी बसवलेले सोलर पॅनल्स फुटले आहेत. अनेक घरांचेही नुकसान झाले असून चारचाकी वाहनांच्या काचा तडकल्या आहेत. या अनपेक्षित गारपिटीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Satara Rain News : सहा एकरातील कलिंगड पीक मातीमोल, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
दरम्यान, मस्करवाडी आणि ओंड येथेही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. ओंड येथे उपसरपंच प्रकाश थोरात यांची सहा एकरातील कलिंगड पीक पावसाने हिरावून नेले तर मस्करवाडीतील शेतकरी बबन मस्कर यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून गेले, तर भिंती कोसळून गायी जखमी झाल्या असून काहींचे पाय मोडले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवलं आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे कराड तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे पशुधन दगावलं, दोन दिवसात वीज पडून सात जनावरांचा मृत्यू
धाराशिव जिल्ह्या मध्ये दोन दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या फळबागांसह पशुधनाचे मोठे नुकसान झालं आहे. बुधवार आणि गुरुवारी झालेल्या विजेचा कडकडाटा अवकाळी पावसात वीज पडून जिल्ह्यातील एकूण सात जनावरे दगावली आहेत. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील एका शेतकऱ्याचा एक बैल व दोन म्हशी कळंब तालुक्यातील दोन आणि वाशी तालुक्यातील दोन जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. मागील महिन्यातही अवकाळी आणि गारपिटीमुळे 15 जनावरे दगावल्याने पशुपालकाचें मोठे नुकसान झालं होतं
Satara Rain : काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान
सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सलग चार दिवसापासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून वादळी वाऱ्या सह गारपिटीचा फटका शेतीला बसताना पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने सातारा शहरासह ग्रामीण भागात वाई,खंडाळा, खटाव, कोरेगाव, कराड,पाटण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका, कलिंगड याबरोबरच आंब्याचा फळांना देखील याचा फटका बसला आहे
Ahilyanagar Rain :अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 33 टक्क्यांहून अधिक क्षेत्र बाधित
संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १८३५० हेक्टर म्हणजेच ३३ टक्क्यांहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात या अवकाळी पावसाचा अधिक फटका बसलाय. पारनेर तालुक्यातील म्हसेवाडीत कालच्या गारपिटीने कांदा, गहू, फळबागांचे नुकसान केलंय. वासुंदे, पळशी, वनकुटे,खडकवाडी,वडगाव सावताळा, पाडळी आळे,म्हस्केवाडी, रेनवडी या गावात मागील दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होतोय. वासुंदे येथे केवळ पिकांचेच नाही तर राहत्या घरांचे काही ठिकाणी नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे.
आणखी वाचा







