रसिक स्पेशल: राममंदिर ते राष्ट्रमंदिर!

0
17
रसिक स्पेशल: राममंदिर ते राष्ट्रमंदिर!


  • Marathi News
  • Opinion
  • Rasik Special Article Written By Shivaray Kulkarni On Ram Mandir To Rashtra Mandir

शिवराय कुळकर्णी7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशभरात जी एकात्म भावना निर्माण झाली आहे, तिच्या बळावर राष्ट्रमंदिराचीही उभारणी होऊ शकते. या वाटेवर भ्रष्टाचारमुक्त, समरस, संपन्न समाजासाठी मानसिक परिवर्तनाची तयारी तर अभिप्रेत आहेच, शिवाय श्रीरामांचे आदर्श समोर ठेवून व्यक्तिगत आणि सामाजिक वर्तन – व्यवहारात सकारात्मक, सुनिश्चित, सातत्यपूर्ण बदलही अपेक्षित आहेत. तसे झाले तर आपल्याला स्वत:च्या अन् देशाच्याही प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर ‘राम’ गवसल्याशिवाय राहणार नाही!

श्रीरामजन्मभूमीचा लढा दीर्घकाळ चालला. तो अखेर आता ४९६ वर्षांनी संपला आहे. रामायण म्हणजेच रामकथा ही भारतीय भावभावनांची भागीरथी आहे. श्रीरामचंद्र हे पिढ्यान््पिढ्या भरतभूचे आदर्श आहेत. राष्ट्रीय अस्मितेवर लागलेला परकीय आक्रमकाचा कलंक पुसला जाणे ही कुठल्याही स्वतंत्र राष्ट्रासाठी गौरवाची आणि ऐतिहासिक स्वरूपाची बाब असते. श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर आकाराला आले आहे. श्रीरामचरित्राकडे पाहता या मंदिराच्या उभारणीसोबत राष्ट्रमंदिराची मजबूत उभारणीही अत्यंत महत्त्वाची असल्याचे जाणवते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा प्रवास हा एका सभ्यतेचा प्रवास होता. राम चालले तो तर सत्पथ! राम ज्या दिशेने चालतील तोच सन्मार्ग असे हे आदर्श जीवन होते. त्याच आदर्शांवर चालणारे समाजमन तयार करण्याची जबाबदारी आता वर्तमानात घ्यावी लागणार आहे. त्यातूनच भारताचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, यात तीळमात्र शंका नाही. वर्तमानातील अनेक घटना सामान्य माणसाला सुन्न करतात. समाज बधीर झाला असावा, असे अनेकदा वाटू लागते. अशा स्थितीत आपल्याला पुन्हा ‘राम’च हवा असतो! प्रभू श्रीरामाच्या काळातही अत्यंत जागरूकतेने वावरणारा समूह केवळ चिंतित नव्हता, तर तो परिवर्तनाच्या दिशेने प्रयत्नशील होता. या समूहाला चिंता होती भरतभूच्या भवितव्याची. या समूहासाठी श्रीराम हेच आशेचा किरण होते आणि तेच त्यांचा विश्वास होते. असूरी शक्तींवर मानवतेचा, अधर्मावर धर्माचा विजय बघण्यासाठी साऱ्या भरतवर्षात एका योजनेला आकार दिला जात होता. याची कल्पना न रामाला होती न चक्रवर्ती सम्राट दशरथाला. अयोध्या आपल्याच सुखात मग्न होती. वंचितांचे अश्रू कुणी पुसायचे? अधमांकडून भरडल्या जाणाऱ्या सज्जन शक्तीचा वाली कोण? सर्व समाजघटक समाधानी आहेत का? अवतीभोवती अमानवी शक्तींनी उच्छाद मांडला असताना राजांना स्वतःच्या क्षात्र तेजाचे विस्मरण कसे काय होऊ शकते, अशा असंख्य प्रश्नांवर एका व्रतस्थ समूहाचे चिंतन सुरू होते. कारण समग्र मानव समाजाची तशी आर्त हाक होती. छोटी राज्ये आपापले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात असुरांना शरण जात होती. प्रतिकाराची भावना क्षीण होती. समुद्रापल्याड असलेल्या असूरी महाशक्तीचा प्रतिकार कसा करायचा, असे सारेच प्रश्न अनाकलनीय होते.

एका पहाटे महर्षी विश्वामित्र अयोध्येच्या राजदरबारात पोहोचले आणि श्रीरामाला घेऊनच अयोध्येच्या बाहेर पडले. विश्वामित्र म्हणजे एका अर्थाने साधनेचा, खडतर तपस्येचा मार्ग. ही साधना स्वतःसाठी नाही. जगातील प्राणिमात्रांच्या कल्याणाचा ध्यास त्यात आहे. विश्वाला दिशा दाखवणारे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांचा विश्वास दुर्दम्य आहे. त्यांची निवड अचूकच ठरणार! पुढचे पाऊल समुद्रापलीकडे असलेल्या असूरशक्तीला आव्हान देणार आहे. या पावलासोबतच उमटणाऱ्या प्रतिध्वनींचा चीत्कार समग्र राष्ट्राच्या कानठळ्या बसवणार होता. यज्ञशाळा बेचिराख झालेल्या.. ऋषी – मुनींची कलेवरे पडलेली.. राक्षसी अत्याचारांना बळी पडलेली भयभीत जनता.. ओसाड पडलेल्या वस्त्या.. अवतीभवती अनाचार, अत्याचार माजलेला.. श्रीरामांनी हे वास्तव बघितले. ते संघर्षाला सिद्ध झाले. त्राटिका, मारीच, सुबाहू यांचा त्यांनी सहज वध केला. हे सोपे काम नव्हते. कोवळ्या राजकुमाराने असूशक्तीला दिलेले ते आव्हान होते. पृथ्वीवर बिनबोभाट वावरणाऱ्या दैत्यांना धडकी भरवणारे हे कृत्य प्रभू श्रीरामांनी सहजसाध्य केले होते. निशाचरांच्या संघटित उच्छादासमोर हतबल झालेल्या सज्जन शक्तीचे मनोबल उंचावणारा हा पहिला श्रीराम विजय होता.

साऱ्यांनी वाळीत टाकलेल्या, वंचित अहल्येला समाजात पुन्हा स्थान देणारा राम.. शबरीच्या उष्ट्या बोरांचा आस्वाद घेणारा राम.. आपल्या वनवासात निषाद, भिल्ल, वानर, गिद्ध यांसह सगळ्या लढवय्या जातीसमूहांना जन्मभूमीसाठी लढण्यास सिद्ध करणारा राम.. विविध भाषा, बोली, वेशभूषा, परंपरा या सर्वांचा सुवर्णमध्य साधून सर्वांना शत्रूच्या सन्मुख उभे करणारा राम.. जगाच्या पाठीवर पहिल्यांदा समुद्र ओलांडून युद्ध करणारा राम.. केवळ सीतेच्या हरणामुळे हा संघर्ष उभा नाही झाला. उलट अधर्मावर धर्माचा विजय संपादन करण्यासाठी पहिला संघटित आणि सशक्त प्रयत्न झाला, म्हणून सीतेला या संकटाला सामोरे जावे लागले. प्रचंड शस्त्रसाठा आणि सैन्यदल असलेल्या कुंभकर्ण, मेघनाद, अहिरावण, महिरावण या महाबलवान राक्षसांशी युद्ध हे काही अतिंद्रिय शक्तीच्या आधारे नव्हते. याचसाठी श्रीराम चौदा वर्षे झटले होते. एकीकडे अफाट वैभवशाली आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असलेली सेना, तर दुसरीकडे मनात प्रतिशोधाची आग प्रज्वलित झालेला जनसमूह असा हा लढा होता. एकूणच असमतोल सामरिक स्थिती होती. ज्याचे नाव घेताच संपूर्ण धरा कापते, ज्याच्या भेदक दृष्टीनेच पृथ्वी आंदोळू लागते असा दानवांचा सम्राट रावण! या रावणाचा रथ प्रचंड त्वेषात, वेगाने येतो आहे.. शस्त्रांचा मुबलक साठा सोबत आहे.. या रथात लंकेचे वैभव प्रतिबिंबित होते आहे.. वनवासी श्रीरामाजवळ काय आहे? रथ आहे, तो धर्माचा! शौर्य आणि धैर्य ही या रथाची दोन चाके. सत्य आणि चारित्र्य या दोन गुणांची पताका या रथावर आहे. स्वअर्जित शक्ती, विवेकी वर्तन, मर्यादांची स्पष्टता आणि लोककल्याण अशा चार वैशिष्ट्यांचे अश्व श्रीरामाच्या रथाला जुंपले आहेत. समतेचा लगाम हाती आहे. भोवती लोकसेवेचे अभेद्य कवच आहे. एका क्षणी श्रीरामांचा बाण अचूक वेध घेतो अन् रावण जमिनीवर कोसळतो.. प्रभू श्रीरामांनी एक अभूतपूर्व विजय संपादन केलेला असतो!

या कसोटीच्या काळातही श्रीरामांनी मर्यादांचे तंतोतंत पालन केले. सुग्रीवाला राज्य परत मिळवून दिले. रावणाच्या जागी बिभीषणाचा राज्याभिषेक झाला. श्रीरामांना या सगळ्या सत्ता स्वतःकडे राखण्याचा मोह नाही. त्यांनी सज्जनशक्तीचे जागरण, संघटन आणि रक्षण केले. आपण रामलीला म्हणतो, ती अवतारी पुरुषाची चमत्कारी कथा नाही. ते यश आहे, एका आदर्श संघटकाचे, एका संकल्पाचे, प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे आणि मानवी मूल्यांचे. असूरशक्ती संपवण्यासाठी संघटित समाजमनाने केलेल्या हुंकाराचे ते यश आहे. श्रीरामांनी पुत्र, पिता, पती, बंधू, राजा, शिष्य म्हणून आदर्श प्रस्थापित केले, म्हणूनच ते आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत. आता पुन्हा अयोध्येत श्रीराम येत असताना आपल्या वर्तमानाला गरज आहे, ती त्यांच्या ध्येयनिष्ठ जीवनातील आदर्शांची. आजही मारीच, शूर्पणखा, सुबाहू, त्राटिकासारख्या प्रवृत्ती डोकावल्या की गरज भासते ती त्यांच्या नि:पातासाठी सरसारवलेल्या युवा श्रीरामाची. देशापेक्षा स्वार्थ मोठा मानणारी रावण वृत्ती बळावताना दिसली की स्वयंसिद्ध श्रीरामाशिवाय पर्याय उरत नाही. व्यवस्था नियंत्रणाबाहेर गेल्या आणि प्रजा भयग्रस्त झाली की गरज भासते ती राजा श्रीरामांची. वंचितांच्या, पीडितांच्या आयुष्यात आणखी दुःख दाटू लागले की जणू समाजातील ‘राम’ हरवला आहे, असेच वाटू लागते.

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशभरात जी एकात्म भावना निर्माण झाली आहे तिच्या बळावर राष्ट्रमंदिराचीही उभारणी होऊ शकते. त्यासाठी ‘राष्ट्रभक्ती’ हे एक असाधारण असे माध्यम आहे. ही राष्ट्रभक्ती जोपासतान काही अगदी साध्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील. उदा. आपण सार्वजनिक स्वच्छतेचे भान ठेवतो का? वृक्षसंवर्धन करतो का? वीज, पाणी आणि अन्य स्रोत मर्यादित प्रमाणात वापरून राष्ट्रीय संपत्ती जपतो का? वाहतुकीचे नियम, सामाजिक वर्तनाचे संकेत पाळतो का? अशा अनेक गोष्टी मनाला विचाराव्या लागतील आणि त्याप्रमाणे स्वत:मध्ये बदलही घडवावे लागतील. राष्ट्रमंदिर निर्मितीच्या या वाटेवर भ्रष्टाचारमुक्त, समरस, संपन्न समाजासाठी मानसिक परिवर्तनाची तयारी तर अभिप्रेत आहेच, शिवाय श्रीरामाचे आदर्श समोर ठेवून व्यक्तिगत आणि सामाजिक वर्तन – व्यवहारात सकारात्मक, सुनिश्चित, सातत्यपूर्ण बदलही अपेक्षित आहेत. तसे झाले तर आपल्याला स्वत:च्या अन् देशाच्याही प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर ‘राम’ गवसल्याशिवाय राहणार नाही!

(संपर्क- shivaraykulkarni@gmail.com)



Source link