- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Dr. Vijay Pandharipande On Change Calender Change Of You
डॉ. विजय पांढरीपांडे13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सुराज्यासाठी आपण सर्वांनी मिळून उदात्त जीवनमूल्यांच्या आधारे नवी व्यवस्था प्रस्थापित करावी लागेल. लोकशाही, राज्यघटना, सामाजिक दायित्व, देशनिष्ठा जपण्याचा विचार पुढ नेण्यासाठी इतरांना दोष देत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील. उद्या, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी भिंतीवर नवे कॅलेंडर लावताना सुराज्यकडे नेणारा हा संकल्प सोडणेजास्त सयुक्तिक ठरेल. वर्ष संपले की आपण उत्साहाने पहिले काम करतो, ते भिंतीवरचे कॅलेंडर बदलण्याचे. जुने ते विसरायचे अन् नव्याचे उत्साहाने स्वागत करायचे. आज सरणारे वर्ष आधीच्या दोन वर्षांच्या लॉकडाऊनने ग्रासलेल्या काळापेक्षा अधिक चांगले, उत्साहाचे होते. आपण सारे सण, उत्सव जोमात, आनंदात साजरे केले. शाळा – कॉलेज नियमितपणे भरत राहिली. लोक कामावर जायला लागले.
मुख्य म्हणजे, गेल्या दोन – तीन वर्षांत प्रत्येकालाच खूप काही शिकता आले. अनेक नवे, कडू – गोड अनुभव आले. कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक जण जबाबदारीने, जाणिवेने वागताना दिसला. कोरोना काळातच नव्हे तर त्यानंतरही आपण ज्या पद्धतीने परिस्थितीशी सामना केला, त्याचे जगभर कौतुक झाले. अजूनही आपली गणना विकसनशील देशांमध्ये होते. काही हरकत नाही. विकसित होण्याच्या दिशेने आपण किती पावले टाकली, यापेक्षा जी टाकली ती किती विश्वासाने, सामर्थ्याने टाकली, हे जास्त महत्त्वाचे. कोरोना काळात आणि त्या पश्चात औद्योगिक क्षेत्राला फटका बसला, बेरोजगारी वाढली, विकासाच्या गतीवर परिणाम झाला. कला क्षेत्रातही अनेकांचा रोजगार हिरावला. ही सारी मंडळी अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर स्थिरावलेली नाहीत. शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल झाले. ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन परीक्षा, शिथिल झालेले नियम, गुणवत्तेशी तडजोड, लांबलेली नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी.. अशा काही नकारात्मक बाबी विसरता येणार नाहीत. या काळात आरोग्य क्षेत्रात आपले वेगळपण दिसले.
एकीकडे सार्वजनिक आरोग्याची हेळसांड झाल्याचे चित्र उभे राहिले आणि त्याच वेळी लसींची निर्मिती करून जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशाने यशस्वी केली. ज्या देशांनी या काळात आरोग्य आणि सार्वजनिक व्यवहारात शिस्त पाळली नाही, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश असूनही आपण मात्र त्याला अपवाद ठरलो, हे उल्लेखनीय. गेल्या वर्षात सरकारी पातळीवर घडलेल्या काही घटना मात्र चिंताजनक ठरल्या. त्यातही आपल्या राज्याच्या राजकारणाने अत्यंत खालचा थर गाठला. सध्या वयाच्या सत्तरी – ऐंशीत असलेल्या पिढीने स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर काळातील एकाहून एक कणखर, ध्येयनिष्ठ नेतृत्वं अनुभवली. यशवंतराव चव्हाणांचे संयमी, सुसंस्कृत नेतृत्व पाहिले. आज अगदी आपली आपल्यालाच लाज वाटावी, अशी परिस्थिती आली आहे. आपण असे लोकप्रतिनिधी कसे निवडून दिले, असा प्रश्न अनेक सुजाण, सजग नागरिकांना पडत असेल.
इथे कोणत्याही एका राजकीय पक्षाला दोष देऊन चालणार नाही. कारण सगळे सारखेच असल्याचे या वर्षातील अनेक घटनांनी आपल्याला दाखवून दिले. म. गांधी म्हणत त्याप्रमाणे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य मिळाले का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच मिळेल. गांधीजींच्या भाषेत आपल्यावर आपले राज्य असणे म्हणजे स्वराज्य! धर्म, नीती, निःस्वार्थ भाव या मूल्यांच्या संवर्धनातून सामाजिक, नैतिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळणे म्हणजे स्वराज्य प्राप्त होणे. स्वराज्यातून सुराज्य निर्माण करणे ही व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनमूल्यांतून साध्य होणारी गोष्ट आहे.
आपल्याला उदात्त जीवनमूल्यांचा विसर पडत चालला आहे. राजसत्ता कुणाचीही असो, दुर्दैवाने सामान्यांच्या आयुष्यात मोठे, लक्षणीय परिवर्तन घडत नाही. परिणामी सुराज्याचे स्वप्न पूर्णत्वाला जात नाही. हे घडण्यासाठी आपण सर्वांनी मिळून उदात्त जीवनमूल्यांच्या आधारे नवी व्यवस्था प्रस्थापित करावी लागेल. लोकशाही, राज्यघटना, सामाजिक दायित्व, देशनिष्ठा जपण्याचा विचार पुढे नेण्यासाठी इतरांना दोष देत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील. उद्या, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी भिंतीवर नवे कॅलेंडर लावताना सुराज्यकडे नेणारा हा संकल्प सोडणे जास्त सयुक्तिक ठरेल. आपल्या तरुणाईत प्रतिभेची मुळीच कमतरता नाही. पण, तिच्या बुद्धिमत्तेला, ऊर्जेला, उमेद – उत्साहाला नेमकी दिशा देण्याची गरज आहे. केवळ नोकरी मागणारे हात नको, तर नोकरी देणारेही हात देशाला हवे आहेत. नवा भारत घडवण्यासाठी जगाला सुधारण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्याच अवतीभवतीच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी हातभार लावणे आणि आपण स्वत: विकासाच्या प्रक्रियेचा सक्रिय भाग होणे जास्त महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रम या त्रिसूत्रीच्या बळावर सारे काही शक्य आहे.
आम्हाला हे हवे आणि ते हवे अशी हाव करून आपण जे कमवत जातो, गोळा करतो त्याचा ऐनवेळी काही उपयोग होत नाही, हे आपण कोरोनाच्या दोन वर्षांत चांगले अनुभवले आहे. आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या, तर आजच्या काळात आपल्या उदरनिर्वाहाची सोय करणे सहजशक्य आहे. तेवढे स्रोत निसर्गाने, नियंत्याने निर्माण करून ठेवले आहेत. मी आहे आणि मलाच हवे या संकुचित वृत्तीपेक्षा, इतर लोक आहेत म्हणून मी आहे, माझे अस्तित्व आहे, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. आपली प्रगती स्वत:पेक्षाही अन्य लोकांवर, त्यांच्यासोबतच्या सहकार्य – सामंजस्यावर, शेअरिंग – केअरिंगवर अवलंबून आहे, हा भाव हवा. आफ्रिकन देशात उबंटू नावाचे तत्त्वज्ञान आहे. ज्या नीतिकथेतून ते सांगितले जाते, ती अशी : एक शाळेत शिक्षक मुलांसाठी धावण्याची स्पर्धा ठेवतात. शिक्षक मुलांना सांगतात, ‘त्या दूरवरच्या झाडाखाली एक टोपली आहे, त्यात शंभर चॉकलेट आहेत. जो मुलगा धावण्याच्या शर्यतीत पहिला येईल, त्याला ती शंभर चॉकलेटची टोपली बक्षीस मिळेल.’ स्पर्धा सुरू होते. शिक्षक शिटी वाजवतात…
आता कल्पना करा, या मुलांनी काय केले असेल? पहिला नंबर यावा म्हणून ते सारे अगदी जोरात धावायला लागले? नाही. त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि एकत्र धावत एकाच वेळी झाडाजवळ पोहोचले. मग ती शंभर चॉकलेट त्यांनी एकेक करून आपापसात शेअर केले. जे आफ्रिकन आदिवासी मुलांना कळले, ते आपल्या सर्वांना का समजू नये? नव्या वर्षात, नव्या काळासाठी, स्वराज्याकडून सुराज्याकडे जाण्यासाठी बदलायचे असेल, तर १ जानेवारी २०२४ हा चांगला मुहूर्त आहे. भिंतीवरचे कॅलेंडर बदला अन् त्यासोबत स्वतःदेखील बदला!
(संपर्क- vijaympande @yahoo.com )




